आता नारायण राणे काय करणार? स्वबळावर लढणार की महाआघाडीला साथ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 07:23 IST2019-02-19T07:23:26+5:302019-02-19T07:23:43+5:30
स्वबळावर लढणार की महाआघाडीला साथ!

आता नारायण राणे काय करणार? स्वबळावर लढणार की महाआघाडीला साथ!
मुंबई : भाजपा-शिवसेनेची युती झाली तर माझा मार्ग वेगळा असेल, असे जाहीरपणे सांगणारे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे आता काय भूमिका घेतात या बाबत उत्सुकता आहे. राणे हे राज्यसभेत भाजपाचे खासदार आहेत, पण त्यांनी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा भाजपात विलिन केलेला नाही. त्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. त्यांचे पुत्र नितेश राणे हे काँग्रेसचे आमदार आहेत; पण ते वडिलांच्या राजकीय निर्णयाबरोबर जातील हे स्पष्ट आहे.
राणे यांचे दुसरे पुत्र निलेश हे सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात गेल्यावेळी काँग्रेसचे उमेदवार होते आणि शिवसेनेचे विनायक राऊत यांच्याकडून पराभूत झाले होते. एक शक्यता अशीही व्यक्त केली जात आहे की राणे हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाऊ शकतील. त्यांनी महाआघाडीसोबत यावे ही विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा असल्याचे म्हटले जाते. या बाबत राणे हे प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. आ.नितेश राणे म्हणाले की माझ्या वडिलांनी आधीच भूमिका जाहीर केली आहे. युतीसोबत ते जाणार नाहीत. भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल ते लवकरच निर्णय घेतील.