आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 01:58 PM2024-10-03T13:58:03+5:302024-10-03T13:58:28+5:30
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे 'लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार? यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुडन्यूज दिली आहे...
राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केला आहे. यातील 'लाडकी बहिण' योजना सध्या जबरदस्त चर्चेत आहे. या योजनेसंदर्भात महिला वर्गात प्रचंड उत्साह दिसत आहे. योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायलाही सुरुवात झाली आहे. अनेकांच्या खात्यात पैसे जमाही झाले आहेत. यातच आता, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे 'लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार? यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुडन्यूज दिली आहे. ते नागपूर येथे बांधकाम कामगार मेळाव्यात बोलत होते.
फडणवीस म्हणाले, "आपल्या सरकारने बऱ्याच योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली आणि बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा करणे सुरू झाले आहे. यावेळी फडणवीस यांनी, किती लोकांच्या खात्यात पैसै आले? असा प्रश्न करत उपस्थित महिलांना हात वर करायलाही सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणावर हात वर झाले. यानंतर, फडणवीस म्हणाले, आता काळजी करू नका, परत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आम्ही ऑक्टोबरमध्येच तुमच्या खात्यात जमा करणार आहोत. कारण, सर्व लाडक्या बहिणींना आता आम्हाला दिवाळीत भाऊबिजेची ओवाळणी द्यायची आहे. ती ओवाळणी आम्ही अॅडव्हाॉन्समध्येच तुमच्या खात्यात जमा करणार आहोत.
फडणवीस यांनी दिली 'लेक लाडकी' योजनेची माहिती -
फडणवीस पुढे म्हणाले, "आपण लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत आपल्या घरी जर मुलगी जन्माला आली, तर तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहीजे आणि जन्माला आलेली मुलगी, तिने घराला लखपती बनवायला हवे, म्हणून आपण लेक लाडकी योजना सुरू केली. मुलगी जन्माला आल्याबरोबर, 5 हजार रुपये, ती पहिल्या वर्गात गेल्याबरोबर, 5 हजार रुपये, ती चौथ्या वर्गात गेली की 7 हजार रुपये. ती सातव्या वर्गात गेली की 7 हजार रुपये. ती 11 व्या वर्गात गेली की 8 हजार रुपये आणि ती 18व्या वर्षी 75 हजार रुपये, म्हणजे एकूण एक लाख रुपये मुलगी जन्माला येईल त्या घरामध्ये, त्या मुलीच्या नावाने आपण देत आहोत. जेणेकरून त्या मुलीच्या जन्माचे स्वागत व्हायला हवे."
मुलींना ग्रॅज्यूएशनपर्यंतचे शिक्षण मोफत -
"आपल्याला कल्पना आहे की, आपल्या सरकारने निर्णय घेतला की, मुलींचे शिक्षण 12 वी पर्यंत मोफत होते. मात्र, पुढचं शिक्षण मोफत नव्हतं. आता आपण निर्णय घेतला आहे की, पहिलीपासून ते गॅज्यूएशनपर्यंत मुलिंचे संपूर्ण शिक्षण मोफत होईल. त्यांची संपूर्ण फीस राज्य सरकार भरेल. इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, बीबीए असो, जवळपास 507 कोर्सेसमध्ये दोन लाख, तीन लाख, जी काही फीस असेल ती राज्य सरकारच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय आपण घेतला आहे. कारण आमच्या लक्षात आले की, अनेक वेळा खासगी महाविद्यालयात अॅडमिशन मिळते की मग घरचे लोक विचार करता, एक मुगला आणि एक मुलगी असेल तर मुलाला शिकवू का? कसा तरी पोटाला चिमटा घेऊन. यानंतर मुलीला सांगतात की, तुझ्या भावाला शिकवण्याचे पैसे आमच्याकडे आहेत, तुला काही बाई आम्ही शिकवू शकत नाही. त्यामुळे तू आपलं काही छोटं मोठं शीक आणि लग्न करून चालली जा. त्यामुळे आम्ही निर्णय केला की ठीक आहे, आई-वडिलांकडे पैसे नसतील, पण मुलींचे लाडके मामा राज्यात बसलेले आहेत. ते मुलींची फीस भरतील आणि आपण मुलींची संपूर्ण फी भरणे आता या ठिकाणी सुरू केले आहे." अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
याशिवाय, महिलांसाठी 50 टक्के एसटीचे कन्सेशन दिले आहे. त्यांनीही प्रवास सुरू केला आहे. परिणामी एवढ्या महिलांनी प्रवास सुरू केला की, तोट्यात असलेली एसटी फायद्यात आली, असेही फडणवीस म्हणाले.