"आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालताहेत...", उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 06:58 PM2024-08-06T18:58:48+5:302024-08-06T19:06:24+5:30

जे आम्हाला दिल्लीची पायपुसणी म्हणायचे, ते आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालायला जात आहेत, अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

"Now why are they prostrated in Delhi...", Shinde group leader Sanjay Shirsat criticizes Uddhav Thackeray's visit to Delhi | "आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालताहेत...", उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची टीका

"आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालताहेत...", उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची टीका

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा लोकसभेप्रमाणेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. त्यासाठी आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागावाटपाची चर्चा करत आहेत. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. 

यावरून शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. "जे आम्हाला दिल्लीची पायपुसणी म्हणायचे, ते आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालायला जात आहेत", अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसंच, आगामी विधानसभा निवडणुकांसाठीच्या जागावाटपावरही संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे.  

संजय शिरसाट म्हणाले, "जे आम्हाला दिल्लीची पायपुसणी म्हणायचे, ते आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालायला जात आहेत. संजय राऊत हे तर वाढपीच्या भूमिकेत आहेत. कोणाला लोणचं द्या, कोणाला पाणी भरून दे, जे एकेकाळी दिल्लीचे नेते महाराष्ट्रात जागा वाटपासाठी येत होते, आता ती परिस्थिती राहिलेली नाही, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली.

याचबरोबर, यावेळी संजय शिरसाट यांनी विधानसभेच्या जागावाटपाबाबतची भूमिका स्पष्ट केली. लोकसभेला खाल्लेली ठेच लक्षात घेता, विधानसभेला आम्ही आमच्या जागा घेऊच, पण यावेळी उमेदवार निश्चितीमध्ये कुठलाही हस्तक्षेप होणार नाही. आमच्या जागांचा निर्णय आम्ही घेऊ, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेणार आहेत. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, आप आणि टीएमसीच्या नेत्यांच्या भेटी उद्धव ठाकरे घेतील. तसंच, या तीन दिवसांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानीही उद्धव ठाकरे भेटीसाठी जाणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडं, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात होत आहे. यासाठी उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असल्याचं सांगण्यात येत आहे.

Web Title: "Now why are they prostrated in Delhi...", Shinde group leader Sanjay Shirsat criticizes Uddhav Thackeray's visit to Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.