आता हसत-खेळत शिकता येणार गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2017 04:44 PM2017-01-16T16:44:29+5:302017-01-16T16:44:29+5:30

किचकट वाटणारा गणित विषय सोडविण्यासाठी गणित पेट्यांमुळे विद्यार्थ्यांना नवसंजिवनी मिळाली

Now you can learn laugh and learn mathematics | आता हसत-खेळत शिकता येणार गणित

आता हसत-खेळत शिकता येणार गणित

googlenewsNext

प्रा. लहू पवार / ऑनलाइऩ लोकमत

धुळे, दि. 16 - शैक्षणिक बदलाचा एक भाग म्हणून साक्री तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने शासनामार्फत प्राप्त झालेल्या ४२५ ‘गणित पेट्यांचे वाटप’ तालुक्यातील २५६ जि.प. शाळांना वाटप केले आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना आता जि.प. शाळांमध्ये हसत-खेळत गणिताचे धडे दिले जाणार आहेत. किचकट वाटणारा गणित विषय सोडविण्यासाठी गणित पेट्यांमुळे विद्यार्थ्यांना नवसंजिवनी मिळाली आहे.
गणित समृद्धीकरणासाठी शासनाचा पुढाकार
सध्याच्या काळात अनेक पालक त्यांच्या मुला-मुलींना जि.प. शाळेत शिक्षण घेण्यास नकार देतात. हा दृष्टीकोन बदलावा या चांगल्या हेतूने महाराष्ट्र शासनाने सर्व जि.प. मराठी शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गणित समृद्धीकरण’ साहित्य संचाचे वाटप केले गेले. याचा फायदा मात्र, अल्पावधीतच पहायला मिळत आहे. अनेक विद्यार्थ्यांसह पालकही या गणित पेट्या शाळेत जाऊन पहात आहेत. या नवीन प्रयोगामुळे विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. काही तरी नवीन पहायला मिळते आहे, असा या गरीब परिस्थितीतील विद्यार्थ्यांना वाटत आहे.
विद्यार्थी व शिक्षकांचे संभाषण वाढणार
जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची प्रचंड भीती असते. मात्र, या गणित व भूमितीच्या विविध शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचे संभाषण वाढणार आहे. या संभाषणामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांची भीती निश्चितच दूर होण्यास मदत होईल, असे साक्री तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी बी. बी. भिल यांनी सांगितले आहे.
गणिताचा अभ्यास पक्का होणार
प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी शिक्षकांना घाबरत असतात, म्हणून कोणीही प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र, या शैक्षणिक साहित्यामुळे निदान त्रिकोण, वर्तुळ हातात घेऊन याचे नाव काय? त्याचा उपयोग काय? असे प्रश्न शिक्षकांना विचारायला सुरुवात झाली आहे. यामुळे शिक्षक- विद्यार्थ्यांचा संवाद वाढतो आहे. शैक्षणिक जीवनात गणित हा महत्त्वाचा विषय आहे. प्राथमिक शाळेपासून याचा पाया भक्कम असेल, तर शिखर गाठता येते, म्हणून गणिताचा चांगला सराव काळाची गरज असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी गणिततज्ज्ञ भास्कराचार्य गणित समृद्धीकरण कार्यक्रम राज्यात नवसंजिवनी देणारा ठरत आहे. यामुळे गणिताची गोडी निर्माण होत आहे. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर उपक्रम
ग्रामीण भाग व आदिवासी पाड्यांवरील बहुतांश विद्यार्थी गणितापेक्षा शिक्षकांनाच जास्त घाबरतात, म्हणून शैक्षणिक शंका कोणीही विचारत नाहीत, मात्र, यामुळे संख्या रेषा, त्रिकोण, ठोकळे, मणी, चकत्या कशासाठी आहेत, हे जरी त्या विद्यार्थ्याने शिक्षकाला विचारले तरीही या साहित्यामुळे का होईना, परंतु, सुसंवाद होण्यास सुरुवात झाल्याचे अनेक पालकांनी सांगितले आहे. परिणामी, शिक्षण क्षेत्रात प्रात्यक्षिकांद्वारे दिलेले शिक्षण विद्यार्थी वर्गात जास्त व लवकर फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.

Web Title: Now you can learn laugh and learn mathematics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.