एनटीसीच्या जमिनी विकणार नाही - गंगवार

By Admin | Published: February 19, 2016 03:31 AM2016-02-19T03:31:11+5:302016-02-19T03:31:11+5:30

मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये असलेल्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) बंद गिरण्यांच्या जमिनी न विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

NTC will not sell land - Gangwary | एनटीसीच्या जमिनी विकणार नाही - गंगवार

एनटीसीच्या जमिनी विकणार नाही - गंगवार

googlenewsNext

मुंबई : मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये असलेल्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) बंद गिरण्यांच्या जमिनी न विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागांवर वस्त्रोद्योगाशी संबंधित पर्यायी उद्योग चालवले जातील, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष कुमार गंगवार यांनी दिली.
वांद्रे कुर्ला संकुलातील ‘मेक इन इंडिया सेंटर’ येथे वस्त्रोद्योगवरील परिसंवादानंतर पत्रकारांशी गंगवार बोलत होते. देशभरात एनटीसीच्या बंद गिरण्यांच्या जमिनींचा सरकारने आढावा घेतला असून, यापुढे या जमिनी आम्ही विकणार नाही. यातील बहुतांश जागा या शहरी भागात असल्याने तेथे पुन्हा कारखाने सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे तिथे वस्त्रोद्योगाशी निगडित अन्य प्रकल्प चालविता येतील का, याची चाचपणी करण्यात येत आहे. लघु व मध्यम उद्योगांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे गंगवार यांनी सांगितले.
केंद्रीय वस्त्रोद्योग धोरण अंतिम टप्प्यात आहे. त्यावर विविध मंत्रालयांशी चर्चा पूर्ण झाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात येईल. यंदा कापूस उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्र सरकारने २४ टेक्सटाइल पार्कला परवानगी दिली असून, त्यामुळे साडेचार लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सध्या देशात ७२ टेक्साटाइल पार्क सुरू आहेत, असे गंगवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: NTC will not sell land - Gangwary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.