बांधकाम परवानग्यांची संख्या आता निम्म्यावर

By admin | Published: January 3, 2016 04:49 AM2016-01-03T04:49:09+5:302016-01-03T04:49:09+5:30

मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या इमारत बांधकाम विषयक विविध परवानग्या व संबंधित कार्यपद्धती व प्रमाणपत्रांचे सुलभीकरण करण्यात आले असून, आता परवानग्यांची संख्या ११९वरून ५८

The number of building permissions is now half | बांधकाम परवानग्यांची संख्या आता निम्म्यावर

बांधकाम परवानग्यांची संख्या आता निम्म्यावर

Next

- मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या इमारत बांधकाम विषयक विविध परवानग्या व संबंधित कार्यपद्धती व प्रमाणपत्रांचे सुलभीकरण करण्यात आले असून, आता परवानग्यांची संख्या ११९वरून ५८ करण्यात आली आहे. ६१ परवाने रद्द करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लायसन्स राज कमी करण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे इमारत बांधकाम विषयक प्रशासकीय प्रक्रिया अधिक वेगवान व पारदर्शक होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिकेने इमारत बांधकाम परवानग्यांबाबत तयार केलेली सुधारित कार्यपद्धती सर्वांसाठी उपयुक्त असून, राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका यांनीदेखील मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर अशाच प्रकारची कार्यपद्धती निश्चित करून ही सर्व माहिती ई-प्लॅटफॉर्मवर आणण्याचे निर्देशही या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
लायसन्स राज कमी करण्याची गरज असल्याचा लेख शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केला होता. त्या पार्श्वभूमीवर, ६१ परवाने रद्द करत मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सुधारित इमारत प्रस्ताव मंजुरी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, महापालिका आयुक्त अजय मेहता आदी या वेळी उपस्थित होते.
मुंबईत इमारत बांधकामासाठीच्या परवानग्या समांतर पद्धतीने राबविण्यात येणार असल्याने लागणारा कालावधी केवळ ६० दिवसांवर येणे अपेक्षित आहे. यामुळे घरांच्या किमतीही कमी होऊन सर्वसामान्यांना याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर या सर्व प्रकिया आॅनलाइन झाल्यानंतर या प्रक्रियेचे १५ ते २० दिवसांनी सातत्याने मूल्यमापन करणे गरजेचे असल्याचे मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. या सर्व परवानग्या वेळेत दिल्या तर परवडणारी घरे वेळेत देणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

काय आहेत वैशिष्ट्ये
- चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) सवलत विषयक प्रस्ताव असल्यास त्याबाबतची प्रक्रिया कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावर सुरू होणार आहे. यामुळे साहजिकच छाननी प्रक्रिया वेगवान होण्यास मदत होईल.
- इमारतीसंदर्भात शुल्क इत्यादींचा भरणा करण्यासाठी यापूर्वी विविध स्तरावर ८९ टप्पे होते, त्याचप्रमाणे हा भरणा विविध ठिकाणी करावा लागत असे. आता एक खिडकी पद्धत असेल.
- इमारत बांधकामादरम्यान इमारतीची अंतर्गत मलनि:सारण व्यवस्था, अंतर्गत नळ जोडण्या, अंतर्गत विद्युत व्यवस्था तसेच इतर तांत्रिक व्यवस्था आदींबाबतीत संबंधित अधिकृत बाह्यसेवा पुरवठादाराचे / सल्लागारांचे स्वयं प्रमाणपत्र पद्धती आता स्वीकारण्यात आली आहे.
- नवीन इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र व इमारत पूर्णत्वाचा दाखला यापूर्वी स्वतंत्रपणे दिले जात होते, ते आता एकाचवेळी दिले जाणे शक्य होणार आहे.
- इमारत बांधकाम प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यात आले असून आता संबंधित प्रस्तावाची छाननी सहायक अभियंता स्तरावर पूर्ण करण्यात येणार आहे.

Web Title: The number of building permissions is now half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.