नगरसेवकांची संख्या १२८ राहणार
By admin | Published: August 23, 2016 01:31 AM2016-08-23T01:31:37+5:302016-08-23T01:31:37+5:30
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आदेश जारी केले
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आदेश जारी केले असून, २०११ च्या जनगणनेनुसार प्रभागरचना होणार आहे. त्यामुळे चार सदस्यांचा एक प्रभाग यानुसार निवडणूक होणार आहे. १२८ वॉर्ड आणि ३२ प्रभाग असणार आहे. त्यामुळे पॅनेल लोकसंख्या ५४ हजार असणार असून प्रभाग हा काही ठिकाणी ५९ हजार ४०० तर काही ठिकाणी ४८ हजार ३०० लोकसंख्येचा असणार आहे.
निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना करण्यासंदर्भात सहा टप्पे केले आहेत. त्यात प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करणे, प्रस्तावास मान्यता देणे, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गातील अनुसूचित जाती-जमाती याची आरक्षण सोडत काढणे, प्रभागरचना प्रसिद्ध करणे, हरकती व सूचनांवर सुनावणी घेणे, अंतिम प्रभागरचना तयार करून त्यास मान्यता घेऊन प्रसिद्धी देणे असे टप्पे असणार आहेत. निवडणूक निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांची असल्याचे निवडणूक आयोगाने सूचित केले आहे. तसेच आयुक्तांनी त्यांच्या मदतीसाठी उत्कृष्ट व प्रामाणिक अधिकारी आणि एका कोअर समितीची नियुक्ती करावी, असेही आदेशात म्हटले आहे.
लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप टळणार
गूगल मॅपच्या आधारे प्रभागरचना होणार असल्याने लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप टळणार आहे. निवडणूक आयोगाने महापालिकांना या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. वस्त्याचे आणि अनुसूचित जाती-जमाती यांच्या वस्त्यांचे विभाजन करू नका, तसेच नागरिकांचे दळणवळण विचारात घ्यावे, त्या त्या प्रभागांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, दवाखाना, स्मशानभूमी, पाणवठ्याच्या जागा अशा सुविधांमध्ये बदल करू नये. एका इमारतीचे, चाळींचे, घरांचे विभाजन दोन प्रभागांत होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच प्रभागरचना करताना प्रगणक गट फोडू नये, तसेच सीमारेषांचे वर्णन उत्तर, पूर्व, दक्षिण व पश्चिम यानुसार करावे, असे सूचित केले आहे.
(प्रतिनिधी)
>प्रत्येक प्रभागात एक ओबीसी जागा
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने महापालिकांना निवडणुकीसाठी दिल्या गेलेल्या आदेशानुसार दीडशे घरांचे सुमारे तीन हजार गट तयार करण्यात आले होते.
२०१२ च्या निवडणुकीत आरक्षणातील आकडेवारी ही ६४ प्रभागांनुसार करण्यात आली होती. ती आता ३२ प्रभागांनुसार करण्यात येणार आहे. त्यामुळे २०१२ चे सूूत्र बदलणार असून, अनुसूचित जाती-जमाती या प्रवर्गाच्या जागांत कमी-अधिक प्रमाण होणार आहे.
एकूण जागांच्या २८ टक्के जागा या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव राहणार असून, प्रत्येक चार सदस्यीय प्रभागातील एक जागा ही ओबीसीची असणार आहे.
>प्रभाग रचनेसाठी सूचना
गूगल अर्थच्या माध्यमातून असणाऱ्या नकाशावर प्रगणक गटांच्या सीमा हिरव्या रंगाने दर्शविण्यात येणार असून, प्रगणक गटांची लोकसंख्या दर्शविण्यात येणार आहे. तसेच जनगणना प्रभागांच्या सीमा या निळ्या रंगाने दर्शविण्यात येणार आहेत. त्यानंतर नकाशावर रस्ते, नद्या, नाले, रेल्वे लाइन या गोष्टी स्पष्टपणे दर्शवाव्यात; तसेच नवीन निवडणूक प्रभागांच्या हद्दी निळ्या रंगाने दर्शविण्यात याव्यात. नकाशांचा आकार, नकाशावर दर्शविलेले प्रगणक गटांचे क्रमांक, लोकसंख्या वाचनीय असावा. नकाशे सुलभपणे हातळता यावेत, याप्रमाणे दोन-तीन भागात तयार करण्यात यावेत. प्रत्येक प्रभागाचा नकाशा स्वतंत्र करावा, त्यांच्या हद्दी स्पष्टपणे दर्शविण्यात याव्यात, अशा सूचना आयुक्तांना केल्या आहेत.
>असे असतील प्रभाग
महापालिका क्षेत्राचे प्रभाग पाडल्यास चार सदस्यांनुसार एका प्रभागाची निश्चिती केल्यानंतर त्यास अ, ब, क, ड असे संबोधण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या भागिले वॉर्डाची संख्या गुणिले प्रभागातील सदस्यांची संख्या, असे सूत्र प्रभागातील लोकसंख्येसाठी असणार आहे. २०१२ ची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार झाली होती. त्या वेळी महापालिकेत वॉर्डांची संख्या १२८ झाली होती, तर ६४ प्रभाग होते. २०१७ ची निवडणूकही २०११ च्या जनगनणेनुसार होणार आहे. या वेळी चार सदस्यीय प्रभाग असणार आहे. महापालिकेतील लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ असून, लोकसंख्येच्या सूत्रानुसार विचार केल्यास १३ हजार ४९७ लोकसंख्येचा एक वॉर्ड आणि ५४ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असणार आहे.
>असा असेल प्रभाग : तळवडेतून सुरू, सांगवीत समाप्ती
प्रभागरचना सुरू करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी आणि उत्तरेकडून ईशान्य, त्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करीत शेवट दक्षिणेकडे करावा, असे निवडणूक आयोगाने सूचित केले असल्याने तळवडेकडून प्रभाग एकची सुरुवात होणार असून, दक्षिणेकडे असणाऱ्या सांगवी परिसरात ३२वा प्रभाग असणार आहे. निवडणूक आयोगाने सूचित केल्यानुसारच रचना करावी, तसेच त्याच पद्धतीने प्रभागांना क्रमांक देण्यात यावेत, प्रभागरचना करताना भौगोलिक सलगता ठेवावी, असेही सूचित केले आहे.