पुलगाव स्फोटातील मृतांची संख्या अठरा
By admin | Published: June 2, 2016 03:18 AM2016-06-02T03:18:53+5:302016-06-02T03:18:53+5:30
पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला सोमवारी मध्यरात्री आग लागून झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या आणखी दोन जवानांचे मृतदेह हाती लागल्याने मृतांची संख्या १८ झाली आहे.
वर्धा/नागपूर : पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला सोमवारी मध्यरात्री आग लागून झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या आणखी दोन जवानांचे मृतदेह हाती लागल्याने मृतांची संख्या १८ झाली आहे. घटनास्थळ पसिरातील काही इमारती उद्ध्वस्त झाल्याने मलब्याखाली आणखी मृतदेह असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगीमागील नेमके कारण अजूनही गुलदस्त्यात असून, नुकसानीबाबतचा अंदाजही लष्कर प्रशासनाने व्यक्त केलेला नाही. बुधवारी सायंकाळपासून शहिदांचे मृतदेह तिरंग्यात गुंडाळून व पुष्पचक्र अर्पण करून दारूगोळा भांडाराच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर काढायला सुरुवात झाली.
सात जणांची ओळख अद्यापही पटलेली नाही. जखमी झालेल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांसह सर्व १७ जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सावंगी(मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्राने दिली. यातील डेफ्टी कमांडंट जगदीश चंद्रा, शरद यादव, गजेंद्र सिंह या अधिकाऱ्यांना दुपारी हेलिकॉप्टरने पुणे येथील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजला हलविण्यात आले. स्फोटाच्या आवाजाने सात जणांच्या कानाचे पडदे फाटले असून, त्यांना बधिरता आली आहे. सेवाग्राम व सामान्य रुग्णालयाच्या चमूने घटनास्थळावरच १८ मृतदेहांचे शवविच्छेदन केले. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होते.
पुलगाव शोकमग्न
या भीषण दुर्घटनेमुळे पुलगावात शोकमग्न वातावरण होते. शहिद जवानांच्या नातेवाईकांसह शहरातील नागरिकांनी दारूगोळा भांडाराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एकच गर्दी केली होती, तर शहरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शहिदांना आदरांजली अर्पण केली. शहरात ठिकठिकाणी शहिदांना आदरांजली अर्पण करणारे फलक शहर शोकसागरात बुडाल्याचा प्रत्यय देत होते.
.............................
‘ती’ गावे बारुदच्या ढिगाऱ्यावर
केंद्रीय दारूगोळा भांडारात वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे परिसरातील गावांमध्ये भीती आहे. आतापर्यंत स्फोटाच्या चार घटना घडल्या आहेत. उन्हाळा आला की ही मंडळी मूठीत जीव घेऊन असतात. बॉम्ब स्फोट झाल्यानंतर हवेत उडालेले लोखंडी तुकडे परिसरातील ५ कि.मी. परिघात असलेल्या गावांमध्ये जावून पडत असल्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. या घटनांममुळे आम्ही बारुदच्या ढिगाऱ्यावर जीव मूठीत घेऊन राहतो, अशी भीती सदर गावकऱ्यांनी व्यक्त केली.
.................
मृताच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला भीषण आग लागून झालेल्या स्फोटात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये तर जखमींना एक लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास दिले असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ......................
दारुगोळ भांडाराच्या
सेफ्टी आॅडिटचा आदेश
श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील लष्कराच्या सर्व दारुगोळा भांडाराचे सुरक्षेच्या दृष्टीने आॅडिट करण्याचा आदेश विधानसभाध्यक्ष कविंदर गुप्ता यांनी बुधवारी राज्य सरकारला दिला आहे.
पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला आग लागून १८ जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकारला खबरदारी घेण्याचा सल्ला दिला.