मृत्युमुखी मेंढ्यांची संख्या ९५ वर
By admin | Published: October 3, 2016 01:55 AM2016-10-03T01:55:52+5:302016-10-03T01:55:52+5:30
पिंपळी येथील विषबाधेमुळे अत्यवस्थ झालेल्या मेंढ्यांचे मृत्युसत्र सुरूच आहे.
बारामती : पिंपळी येथील विषबाधेमुळे अत्यवस्थ झालेल्या मेंढ्यांचे मृत्युसत्र सुरूच आहे. रविवारी (दि. २) ११ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांची संख्या ९५ वर पोहोचली आहे. एमआयडीसीतील एका चॉकलेट कंपनीचे आणलेले खराब चॉकलेट येथील पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या उद्योजकाने धोकादायक पद्धतीने उघड्यावर टाकले होते. ते खाल्ल्याने मेंढ्यांना विषबाधा झाली आहे.
उत्तम शंकर केसकर, आनंदराव किसन केसकर, कुंडलिक दत्तात्रय केसकर, तानाजी तुकाराम केसकर यांच्या मेंढ्यांना विषबाधा झाली आहे. बुधवारी (दि. २८) हा प्रकार घडला. यामधून सुरुवातीला १७५ मेंढ्यांना विषबाधा झाली. त्यापैकी आजअखेर ९५ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे, तर अजूनही ३४ मेंढ्या विषबाधेमुळे आजारी आहेत. या मेंढ्यांना वाचविण्यासाठी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची ३ पथके त्या ठिकाणी उपचारासाठी तळ ठोकून आहेत.
पशुसंवर्धन अधिकारी
डॉ. आर. एल. ओव्हाळ यांनी सांगितले की, मेंढ्यांनी खाललेल्या पदार्थामुळे त्यांच्या पोटात आम्ल तयार झाले. त्यातून विषबाधा झाल्याने मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे तपासणीत उघड झाले आहे. (वार्ताहर)