गुंतवणुकीचा आकडा खरा की फुगविलेला?
By Admin | Published: August 9, 2015 02:36 AM2015-08-09T02:36:41+5:302015-08-09T02:36:41+5:30
तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये संपूर्ण भारतात येत्या १०वर्षांत दोन अब्ज डॉलरची मानस व्यक्त केला होता. गाऊ यांची ती मुलाखत खरी मानायची की ही कंपनी
मुंबई : तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये संपूर्ण भारतात येत्या १०वर्षांत दोन अब्ज डॉलरची मानस व्यक्त केला होता. गाऊ यांची ती मुलाखत खरी मानायची की ही कंपनी येत्या पाच वर्षात एकट्या महाराष्ट्रात पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे खरे मानायचे, मानायचे असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.
केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील देवेंद्र फडवणीस सरकार आल्यानंतर ‘मेक इन इंडिया’सारख्या घोषणा सतत ऐकावयास मिळत आहेत. राज्यामध्ये गुंतवणूक आणण्याकरिता अनेक देशांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री सहकुटुंब दौरे करत आहेत, प्रत्येक दौऱ्यानंतर राज्यावर हजारो कोटींच्या गुंतवणुकीच्या घोषणांचा वर्षाव पहावयास मिळतो. पण प्रत्यक्षात वास्तव वेगळेच आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी फॉक्सकॉन कंपनी आणि राज्य सरकार यांच्यात पाच अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा सामजस्य करार झाल्याचे जाहीर केले. त्या संदर्भात बोलताना चव्हाण असेही म्हणाले की, गुंतवणुकीचा हा आकडा जनतेची दिशाभूल करण्याकरिता वाढवून सांगितलेला नसावा आणि खरोखरच एवढ्या प्रमाणात गुंतवणूक यावी अशी कॉंग्रेस पक्षाची अपेक्षा आहे आपल्या या म्हणण्याचे अधिक स्पष्टिकरण देताना चव्हाण म्हणाले, दोन तीन दिवसांपूर्वी याच टेरी गाऊ यांनी एका मुलाखतीमध्ये संपूर्ण भारत देशात दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक पुढील १० वर्षात करण्याचा मानस व्यक्त केला होता. तसेच सदर गुंतवणूक ही एकाच प्रकल्पात नव्हे तर अनेक सामंजस्य करारान्वये केली जाईल. म्हणजे अनेक कंपन्यांबरोबर विविध प्रकल्पांद्वारे ही गुंतवणूक नरेंद्र मोदी यांचे सरकार जर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणत असेल तर केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले होते. दोन दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या उद्योगसमूहाचा मानस बदलला असेल तर त्याचे आपण स्वागतच करतो असेही चव्हाण म्हणाले.
परंतु नरेंद्र मोदी सरकारची आणि एकंदरच भाजप सरकारची मानिसकता ही अतिरंजीत आश्वासने व प्रत्येक विषयाचे मार्केटिंग करण्याची राहिलेली आहे. २००३ पासून २०११ पर्यंत नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले होते. परंतु त्यापैकी फक्त आठ टक्केच गुंतवणूक वास्तवात झाली, असा दावाही चव्हाण यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी केलेली ही घोषणा बोलाची कढी आणि बोलाचाच भात ठरेल अशी आपणास भीती वाटते असा उपरोधीक टोलाही चव्हाण यांनी लगावला. (विशेष प्रतिनिधी)