‘फणसाड’ अभयारण्यात वाढली बिबट्यांची संख्या
By admin | Published: May 18, 2016 03:30 AM2016-05-18T03:30:14+5:302016-05-18T03:30:14+5:30
बिबट्या, इतर प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.
आगरदांडा : दरवर्षी मे महिन्यात येणाऱ्या बुध्दपौैर्णिमेच्या आठ दिवसांपासून प्राण्यांची गणना केली जाते, असे फणसाड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल सूर्यमान तडवी यांनी सांगितले. यावेळी बिबट्या, इतर प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. याप्रमाणे सांबर ३, भेकर २२, डुक्कर ५३, शेकरू १९, ससे १०, काळीमांजर ०६, लांडोर १३, रानमांजर ०८, जवादा ३, माकडे ११०, वानर २५, बिबटे १०, रानकोंबडे २८, मोर २३, घोरपड १, गरूड ६ अशी गणना झाली होती.
परिसरात फणसाड अभयारण्य क्षेत्राचा विस्तार सुमारे ५४ किमी क्षेत्रावर झालेला आहे. मुरु ड, रोहा, अलिबाग तीन तालुक्याला या क्षेत्राची हद्द स्पर्श करते. नवाब सरकारने हे अरण्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून संरक्षित केलेले आहे. या अभयारण्यात वन्यजीव प्राण्यांबरोबर औषधी वनस्पती व इतर उपयोगी वृक्षांचा भरमसाट साठा उपलब्ध आहे. या अभयारण्यात बिबट्या, सांबर, भेकरे, डुक्कर, शेकरू, पिसोरी, ससा, कालामांजर, रानमांजर, जवादा, सालिंदर, मुंगुस, वानर, मोर, गिधाड आदि प्राण्यांचे वास्तव्य आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई जाणवत असून फणसाड अभयारण्यात प्राण्यांना पिण्याच्या पाण्याचे स्रोत २७ ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती फणसाड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल सूर्यमान तडवी यांनी दिली.
अभयारण्यात जर एखाद्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आटले असेल तर त्याठिकाणी खड्डा करून पाणी साठवले जाते. वन्यप्राण्यांना पाणी कसे पुरविता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या मुरूड तालुक्यात दिवसाचे तापमान ३५ डिग्री सेल्सियसमध्ये आहे. कडक उन्हात पिण्याच्या पाण्याची कमतरता पडू नये म्हणून जेवढे पाण्याचे स्रोत आहेत त्याची प्रत्येक दिवशी तपासणी केली जात आहे. पाणी आटले किंवा प्रवाह कमी झाला तर ताबडतोब खड्डा खणून जमेल तेवढे पाणी साचवले जात आहे. मे अखेरपर्यंत चिखलगाण, सावरट तलाव, धरणाची गाण, सावरट गाण याठिकाणी भरपूर पाणीसाठा असल्याने वन्यजीव प्राण्यांची पाण्यासाठी कोणतीही परवड होत नाही. (वार्ताहर)