महाराष्ट्रात दोन वर्षांत बिबट्यांची संख्या दुप्पट! देशातील बिबट्यांच्या गणनेचा अहवाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 06:55 PM2021-01-12T18:55:52+5:302021-01-12T18:57:14+5:30

राज्यात एकदम १६९० बिबटे असल्याचे अहवालात नमूद

The number of leopards in Maharashtra has doubled in two years! Leopard census report released in the country | महाराष्ट्रात दोन वर्षांत बिबट्यांची संख्या दुप्पट! देशातील बिबट्यांच्या गणनेचा अहवाल जाहीर

महाराष्ट्रात दोन वर्षांत बिबट्यांची संख्या दुप्पट! देशातील बिबट्यांच्या गणनेचा अहवाल जाहीर

Next
ठळक मुद्देकेंद्राच्या अहवालाची आकडेवारी ; वन्यजीव अभ्यासकांचा यावर आक्षेप

श्रीकिशन काळे-
पुणे : देशात नुकताच बिबट्यांच्या गणनेचा अहवाल जाहीर केला. त्यात महाराष्ट्रात १६९० बिबटे असल्याचे सांगितले आहे. परंतु, हा अहवाल अत्यंत चुकीचा असून, गेल्या अहवालात आणि यामध्ये खूप तफावत दिसून येत आहे. दोन वर्षांमध्ये एकदम बिबट्यांची संख्या दुप्पट झाल्याचे अहवालात दाखवले आहे. तर  चार वर्षांत ६० टक्के बिबट्यांत वाढ झाली आहे. त्यातही अभयारण्याबाहेरील क्षेत्रातील बिबट्यांची गणनाच केलेली नाही. त्यामुळे वन्यजीव अभ्यासकांनी या अहवालावर आक्षेप नोंदवले आहेत.  

हा अहवाल नॅशनल टायगर कन्झरवेशन ॲथॅारिटी आणि वाइल्डलाइफ इन्स्टिस्ट्यूट ऑफ इंडिया, देहराडून यांनी तयार केला. त्यासाठी अनेक संशोधक सहभागी झाले.  महाराष्ट्रात २०१४ मध्ये ७०० बिबटे होते. तर २०१८ मध्ये ९०० नोंदवले गेले. त्यात २०० मृत्यू झाले. त्यानंतर आता राज्यात एकदम १६९० बिबटे असल्याचे अहवालात नमूद आहे. म्हणजेच दोन वर्षांमध्ये जवळपास दुप्पट संख्या झाल्याचे स्पष्ट होते. त्यातही ही संख्या फक्त अभयारण्य आणि संरक्षित क्षेत्रातीलच आहे. खरंतर आज चंद्रपूर, नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातही बिबटे दिसत आहेत. तसेच उसात राहणाऱ्यांची संख्याच मोजलेली नाही.   प्रजननाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील बिबट्यांची संख्याही अंदाजे १२०० च्या जवळपास असायला हवी होती. पण ती थेट १७००च्या जवळ गेली आहे. याचाच अर्थ हा आकडा चुकीचा असल्याचे दिसून येते.  
जर दोन वर्षांत बिबट्यांची संख्या दुप्पट झाली असेल, तर मग भविष्यात हे बिबटे किती धुमाकूळ घालू शकतात, त्याची कल्पना न केलेली बरी. त्यामुळे आताच या बिबट्यांचे व्यवस्थापन करायला हवे. त्यांचे धोरण ठरवायला हवे. अन्यथा भविष्यात मानव-बिबट संघर्ष टोकाला पोचेल, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक आणि माजी वनअधिकारी प्रभाकर कुकडोलकर यांनी दिली.
===================
भीमाशंकर अभयारण्यातील बिबटे गेले कुठे ?
भीमाशंकर अभयारण्यात आता एकही बिबट्या दाखवलेला नाही. खरं तर भीमाशंकरला १९८६ मध्ये १० बिबटे होते. त्यानंतर २००६ मध्ये ३ होते. त्यानंतर गेल्या वर्षी तर एकही बिबट्या तिथे दिसला नाही. मग हे बिबटे गेले कुठे ? हे सर्व बिबटे आता ऊसाच्या शेतात जुन्नर, नारायणगाव व इतर परिसरात राहत आहेत. मग या बिबट्यांची गणना कोण करणार ? त्यांची संख्या मोठी असणार आहे, असेही कुकडोलकर म्हणाले.
===========================
राज्यातील बिबट्यांची गणना
२०१४  - ७००
२०१८ - ९००
२०२० - १६९०  
======================
गणना करण्याची पुर्वीची अन‌् आताची पध्दत ?
पुर्वी बिबट्यांची गणना त्यांचे ठसे पाहून वन विभागातर्फे केली जात असे. पण आताची गणना कॅमेरे लावून केली आहे. त्यामुळे यामध्ये घोळ होऊ शकतो. एक बिबट्या जर दोन राज्याच्या सीमा रेषेवर असेल, तर तो कधी या राज्यात तर कधी दुसऱ्या राज्यात जाईल. मग त्याची नोंद दोन्ही राज्यात होईल. परिणामी बिबट्यांची संख्या वाढते, असेच काही तरी या अहवालात झाले असल्याचे वन्यजीव अभ्यासकांनी सांगितले आहे.  
=======================

 

Web Title: The number of leopards in Maharashtra has doubled in two years! Leopard census report released in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.