उरी हल्ल्यातील शहीद जवानांची संख्या पोहोचली १८ वर, महाराष्ट्राचा चौथा सुपूत्र शहीद
By admin | Published: September 19, 2016 04:13 PM2016-09-19T16:13:45+5:302016-09-19T17:03:26+5:30
बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांची संख्या वाढली असून १८ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात जखमी झालेले यवतमाळमधील विकास जनार्दन कुळमेथे यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
काश्मीर खोऱ्यात प्रत्यक्ष सीमारेषेपासून जवळच असलेल्या उरी शहरातील भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी रविवारी पहाटे हल्ला केला. प्राणहानीच्या दृष्टीने अलीकडच्या काळातील लष्करी तळावरील हा सर्वांत भीषण हल्ला होता. हल्ल्यानंतर लष्कराने सुमारे तीन तास केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत चारही हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला. हे चारही हल्लेखोर पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे होते व त्यांच्याकडे पाकिस्तानी शस्त्रे होती, असे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाल्याने भारताविरुद्ध दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले.
या हल्ल्यात काल एकूण १७ जवान शहीद झाले, त्यापैकी ३ जवान महाराष्ट्रातील होते. तर विकास जनार्दन कुळमेथे हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते, त्यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान आज त्यांचे निधन झाले. ते यवतमाळमधील वनी तालुक्यातील नेरडचे रहिवासी होते. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान या हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी १५ लाखांची मदत जाहीर केली आहे.