राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ५४; विषाणू संस्थेचा अहवाल, राज्यात ६, मुंबईत ४ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 09:35 AM2021-12-20T09:35:52+5:302021-12-20T09:37:11+5:30
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात रविवारी आणखी ६ रुग्ण ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात रविवारी आणखी ६ रुग्ण ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. यापैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील, तर १ रुग्ण पुणे जिल्ह्यातील आणि १ रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रातील आहे.
आतापर्यंत राज्यात एकूण ५४ ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. त्यात मुंबईतील २२ रुग्ण असून ही राज्यातील सर्वाधिक संख्या आहे. यातील २ रुग्ण कर्नाटक, तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, केरळ, जळगाव आणि औरंगाबाद येथील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.
तसेच, अन्य रुग्णांमध्ये पिंपरी-चिंचवड ११, पुणे ग्रामीण ७, पुणे मनपा ३, सातारा ३, कल्याण-डोंबिवली २, उस्मानाबाद २, बुलडाणा १, नागपूर १, लातूर १, वसई-विरार १ असे एकूण ५४ रुग्ण आहेत. यापैकी २८ रुग्णांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दिवसभरात नोंद झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांमध्ये मुंबईतील चारही रुग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून शोधण्यात आले आहेत. यातील एक रुग्ण मुंबईतील, तर २ रुग्ण कर्नाटक राज्यातील, तर १ रुग्ण औरंगाबाद येथील रहिवासी आहे. यातील २ जणांनी टांझानियाचा, तर २ जणांनी इंग्लंडचा प्रवास केलेला आहे. हे चारही जण पूर्ण लसीकरण झालेले आणि लक्षणविरहित आहेत. सर्व जण सध्या अंधेरीतील सेव्हन हिल रुग्णालयात विलगीकरणात आहेत.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कातील एका ५ वर्षीय मुलामध्ये ओमायक्रॉन विषाणूचे निदान झाले आहे. या रुग्णात कोणतीही लक्षणे नाहीत. पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रातील मध्यपूर्वेत प्रवास करून आलेल्या ४६ वर्षीय पुरुषांमध्ये ओमायक्रॉन विषाणू आढळला आहे. या रुग्णाची लक्षणे सौम्य असून तो सध्या खासगी रुग्णालयात भरती आहे.
७५ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित
विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५६४ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७५ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.