घोटाळेबाज पेट्रोल पंपांची संख्या वाढतीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2017 01:27 AM2017-06-29T01:27:07+5:302017-06-29T01:27:07+5:30
कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या घोटाळेबाज पेट्रोल पंपांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ठाणे पोलिसांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या घोटाळेबाज पेट्रोल पंपांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ठाणे पोलिसांनी राज्यभर केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत ५० पेट्रोल पंपांची तपासणी करून यापैकी ३२ पंपांना सील ठोकले आहे. या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सात आरोपींची कोठडी बुधवारी आणखी दोन दिवसांनी वाढवण्यात आली.
मंगळवारी रात्री ४ पंपांवर धाड टाकण्यात आली. त्यापैकी हेराफेरी आढळलेल्या ३ पंपांना पोलिसांनी सील ठोकले. आतापर्यंतच्या कारवायांमध्ये १४ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी सात जण न्यायालयीन, तर सात जण पोलीस कोठडीत होते. काही पेट्रोल पंपांच्या डिन्स्पेन्सिंग युनिटमध्ये चिनी बनावटीच्या इलेक्ट्रॉनिक चिप्स पोलिसांना आढळल्या. या चिप्स कुणी आयात केल्या, त्याचा वापर करून राज्यभरातील आणखी किती पेट्रोल पंपांनी हेराफेरी केली आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.