भटक्या कुत्र्यांची संख्या घटता घटेना !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 08:18 AM2017-08-03T08:18:36+5:302017-08-03T08:24:08+5:30

महापालिकेकडून ठेकेदारामार्फत गेल्या दहा वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्चून श्वान निर्बीजीकरणाची मोहीम राबविली जात असली, तरी भटक्या आणि मोकाट श्वानांचा उपद्रव काही कमी झालेला नाही.

Number of stray dogs not decreasing | भटक्या कुत्र्यांची संख्या घटता घटेना !

भटक्या कुत्र्यांची संख्या घटता घटेना !

Next
ठळक मुद्दे श्वान निर्बीजीकरणाची मोहीम राबविली जात असली, तरी भटक्या आणि मोकाट श्वानांचा उपद्रव काही कमी झालेला नाही. शहरी भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ही मोठी समस्या आहे.

नाशिक, दि. 3 - नाशिक महापालिकेकडून ठेकेदारामार्फत गेल्या दहा वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्चून श्वान निर्बीजीकरणाची मोहीम राबविली जात असली, तरी भटक्या आणि मोकाट श्वानांचा उपद्रव काही कमी झालेला नाही. दहा वर्षांत ६३ हजार श्वानांचे निर्बीजीकरण झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यात, नरांपेक्षा मादींची संख्या अधिक आहे.

शहरी भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ही मोठी समस्या आहे. मुंबई, पुण्यासह सर्वच शहरात त्यावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नाशिकमध्ये पूर्वी पिठाच्या गोळ्यात विषारी औषध टाकून कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त केला जायचा. परंतु, प्राणिप्रेमींनी त्यास कडाडून विरोध केल्यानंतर न्यायालयाने श्वानांना मारण्यावर निर्बंध आणले. नाशिक महापालिकेमार्फत सन २००७ पासून श्वान निर्बीजीकरणाची मोहीम राबविली जात आहे. सन २००७ मध्ये पहिल्याच वर्षी १७४९ श्वानांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर, निर्बीजीकरणाचा वेग वाढत गेला.

सन २०११-१२ मध्ये सर्वाधिक १० हजार १४८ श्वानांचे निर्बीजीकरण झाले तर गेल्या चार वर्षांपासून सरासरी प्रतिवर्षी साडेसहा हजाराच्या आसपास श्वानांवर निर्बीजीकरण होत आहे. दहा वर्षांत महापालिकेने ६३ हजार ४३३ श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा केला आहे. त्यात ३० हजार ७४ नर तर ३३ हजार ३५९ मादींची संख्या आहे. दहा वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्बीजीकरण होऊनही भटक्या श्वानांची संख्या घटल्याचे दिसून येत नाही.
महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारामार्फत प्रतिदिन सुमारे ३० ते ४० श्वान पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाते.

तीन दिवस त्यांचा पाहुणचार केल्यानंतर त्यांना जेथून पकडले त्याच भागात पुन्हा सोडले जाते. सर्वसाधारणपणे श्वानांचे आयुर्मान १२ ते १५ वर्षांपर्यंत असते. निर्बीजीकरणाच्या मोहिमेत एखादे श्वान जरी सुटले तरी त्याच्यापासून आठ ते दहा श्वानांची संख्या वाढू शकते. त्यामुळे, श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवणे शक्य आहे परंतु, त्यांची वाढ रोखणे अशक्य असल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो.

श्वानांची संख्या नियंत्रणात
महापालिकेने दहा वर्षांपूर्वी श्वान निर्बीजीकरणाची मोहीम सुरू केली. दहा वर्षांत भटक्या श्वानांची संख्या बºयापैकी नियंत्रणात आलेली आहे. अन्य शहरांच्या तुलनेत नाशिक महापालिकेने मोठ्या प्रमाणावर निर्बीजीकरणाचे काम केले आहे. नागरिकांनी उघड्यावर अन्न टाकू नये. महापालिकेमार्फत केवळ निर्बीजीकरण न केलेल्या श्वानांना पकडले जाते. परंतु, निर्बीजीकरण केलेले श्वानही महापालिकेने पकडून न्यावे, अशी अपेक्षा नागरिकांची असते. नागरिकांनी त्याबाबत सहकार्य केले पाहिजे. सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत विभागनिहाय श्वान निर्बीजीकरणाची मोहीम चालते. जेथून श्वान पकडले तेथील नागरिकांच्या स्वाक्षºयाही घेतल्या जातात.
- डॉ. प्रमोद सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा

दरमहा सरासरी ५५० श्वानांचे निर्बीजीकरण
श्वान निर्बीजीकरणाची मोहीम दोन वाहनांमार्फत राबविली जाते. महापालिकेने त्याचे वेळापत्रक तयार केले आहे. महापालिकेचे सहा विभाग आहेत. प्रत्येक विभागात आठवड्यातून दोन दिवस वाहन फिरविले जाते. प्रतीदिन सुमारे ३० ते ४० श्वानांची धरपकड केली जाते. म्हणजेच विभागातून आठवड्याला ७० ते ८० श्वान पकडले जातात. श्वान निर्बीजीकरणाचा वार्षिक सरासरी दर पाहता ६५०० हजार श्वानांवर शस्त्रक्रिया होते. दरमहा सुमारे ५५० श्वानांवर निर्बीजीकरण होत असेल तर भटक्या श्वानांच्या संख्येत घट का होत नाही, हा एक प्रश्न सामान्यांना भेडसावत असतो.

भटक्या श्वानांमुळे अपघाताच्या घटना

महामार्गावर, रस्त्यांवर दररोज असंख्य श्वान गाडीखाली येऊन चिरडून मृत्युमुखी पडतात. अभ्यासकांच्या मते, बव्हंशी अपघात हे भटक्या श्वानांमुळे होतात. रात्रीच्या सुमारास झुंडीने श्वानांची फौज वाहनचालकाच्या मागे धावत सुटते आणि चालकाचे नियंत्रण सुटून अपघातांना निमंत्रण मिळते. याचबरोबर दुभाजकांमधून अथवा रस्ता ओलांडताना श्वान आडवे येऊन अपघात घडण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे, अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. भटक्या श्वानांपासून होणाºया अपघातांची मात्र पोलीस दप्तरी नोंद आढळून येत नाही.

 

Web Title: Number of stray dogs not decreasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.