स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या शंभरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:40 AM2017-07-24T02:40:57+5:302017-07-24T02:40:57+5:30
पावसाळ्यात विषाणूंना पोषक वातावरण निर्माण झाल्याने राज्यासह पुण्यामध्ये स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पावसाळ्यात विषाणूंना पोषक वातावरण निर्माण झाल्याने राज्यासह पुण्यामध्ये स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ३०७४ रुग्ण आढळले असून ३२७ जणांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पुण्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यात जिल्ह्यातील मृत रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे. मात्र यात आजुबाजूच्या जिल्ह्यांतील रुग्णांचाही समावेश आहे.
जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात ३५० स्वाइन फ्लू रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७१ रुग्णांचा मृत्यू झाला. महानगरपालिकेकडे सध्या स्वाईन फ्लूच्या १०० लसी उपलब्ध असून, नवीन लसींसाठी टेंडर प्रकिया पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आरोग्य विभागातर्फे नवीन लसी मागवण्यासंदर्भातील पत्र मिळाले आहे. सध्या स्वाईन फ्लूच्या १०० लसी उपलब्ध आहेत. नवीन लसींसाठी टेंडर काढण्यात आले असून, ही प्रक्रिया पुढील १५ दिवसांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला असून तेथे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. शनिवारपर्यंत १०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील भोर, मंचर, बारामती, इंदापूर व दौैंड येथील उपजिल्हा रुग्णालयातही कक्ष स्थापन केले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शनिवारपर्यंत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तसेच नगरपरिषदा हद्दीतील रुग्णांसह अहमदनगर, सोलापूर, लातूर, सांगली, सातारा येथील रुग्णांचे प्रमाणही येथे अधिक आहे.
स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. पुण्याचे वातावरण विषाणूच्या वाढीस पोषक असल्याने गेल्या काही वर्षांपासून पुण्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. गर्भवती महिला, मधुमेह किंवा
तत्सम जोखमीचे आजार असलेल्या रुग्णांनी लसीकरण करून घ्यावे आणि सामान्य रुग्णांनी फ्लूची लक्षणे दिसून आल्यास दुर्लक्ष न करता
त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, यासाठी जनजागृती करण्यात
येत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
जिल्ह्यात सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात असे रुग्ण तपासणीसाठी कक्ष करण्यात आले आहेत. एखादा रुग्ण आला की त्याची प्राथमिक तपासणी करण्यात येते. तेथे स्वाईन फ्यूसदृश लक्षणे आढल्यास त्याला तत्काळ जिल्हा ़उपजिल्हा रुग्णालयात किंवा ससूनला पाठविण्यात येते. तसेच सर्व आरोग्य केंद्रांकडे औैषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- भगवान पवार,
आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद
स्वाईन फ्लूच्या नवीन लसींबाबत शासनाकडून
पत्र प्राप्त झाले आहे. सध्या
टेंडरची प्रक्रिया सुरू असून, ती १५ दिवसांमध्ये पूर्ण होईल. तोपर्यंत महानगरपालिकेकडे १०० लसी उपलब्ध असून, त्या पुरेशा आहेत. पुण्यातील स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढल्याने दहा दिवसांपूर्वी दिल्लीतील डॉक्टरांचे पथक पुण्यात येऊन गेले. अधिकाऱ्यांसोबत त्यांनी स्वाईन फ्लूचा आढावा घेतला.
- डॉ. अंजली साबणे
पुण्यात जानेवारी महिन्यापासून ३५० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ७१ रुग्णांचा मृत्यू झाला. तर २६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या शहरात १७ स्वाईन फ्लू रुग्ण विविध रुग्णालयात दाखल असून त्यातील ११ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
पावसाळा सुरू झाल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. लहान मुले, तसेच ज्येष्ठांमध्ये थंडी, ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
राज्यात आजवर स्वाईन फ्लूचे ३०७३ बाधित रुग्ण आढळले असून, त्यापैकी ३२७ जणांचा मृत्यू झाला आहे. विषाणूच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाल्याने रुग्णांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी