टँकरची संख्या ६ हजारवरून १२०० वर
By admin | Published: June 19, 2017 02:47 AM2017-06-19T02:47:43+5:302017-06-19T02:47:43+5:30
राज्यात ज्या-ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामे झाली, त्या-त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे टँकरमुक्ती झाल्याचे दिसले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात ज्या-ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामे झाली, त्या-त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे टँकरमुक्ती झाल्याचे दिसले. गेल्या वर्षी मे महिन्यात जवळपास ६ हजार २०० टँकर
सुरू होते. यंदा त्यांची संख्या बाराशेपर्यंत खाली आली. राज्यात आतापर्यंत १ हजार १९० गावे टँकरमुक्त झाली असून, साधारण ५ हजार गावे टँकरमुक्तीच्या मार्गावर आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या काय्रक्रमांतर्गत ‘पाणी’ या विषयावरील कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री बोलत होते. लातुरला मागच्या वेळी रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता, पण नंतर तिथे लोकसहभागातून जलयुक्त शिवारची चांगली कामे झाली आणि अनेक गावे टँकरमुक्त होऊ शकली आहेत. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून योजना तयार करण्यात आली असून साधारण ४१ हजार स्रोतांच्या बळकटीकरणाचे काम सुरू आहे. जलसंपदा, जलसंधारण आणि पाणीपुरवठा विभागांत समन्वय निर्माण करून, राज्य कायमचे टँकरमुक्त करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आघाडी सरकारच्या काळात सर्वच प्रकल्पांना थोडा-थोडा निधी देऊन सगळेच प्रकल्प अर्धवट ठेवण्यात आले होते. आता त्यातील जे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, त्यांना प्राधान्याने निधी देऊन ते पूर्ण करण्याचे धोरण स्वीकारले आहे. २०१९पर्यंत प्रकल्प मोठ्या प्रमाणात पूर्णत्वाला जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी २ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली असून, ९०० कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी दिली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.