कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 03:56 AM2017-09-11T03:56:38+5:302017-09-11T03:56:57+5:30
पूर्वी विक्रीकर असताना ७० हजार व्यापारी कर भरत होते, आता जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर ही संख्या अडीच लाखांवर जाऊन पोहचली आहे, जीएसटीमुळे आगामी काळात राज्याला १० ते १५ हजार कोटी रुपये अधिकचे उत्पन्न मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुणे : पूर्वी विक्रीकर असताना ७० हजार व्यापारी कर भरत होते, आता जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर ही संख्या अडीच लाखांवर जाऊन पोहचली आहे, जीएसटीमुळे आगामी काळात राज्याला १० ते १५ हजार कोटी रुपये अधिकचे उत्पन्न मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याचबरोबर आयकर भरणाºयांची संख्याही ३ कोटींवरून ६ कोटी वाढल्याचे त्यांनी सांगितले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने अमित शहा यांनी लिहिलेल्या ‘भाजपा राजकारणात कशासाठी’ या पुस्तकाच्या मराठी, इंग्रजी व हिंदी आवृत्तींचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार विनय सहस्रबुद्धे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, रवींद्र साठे उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘केंद्र शासनाच्या करणी आणि कथनीमध्ये अंतर नाही. केंद्राकडून सत्तेवर आल्यापासून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार अंमलात आणला जात आहे. देशात ५० टक्के लोकांना शौचालये नव्हती, त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून घर तिथे शौचालय उभारण्याची योजना सुरू करण्यात आली. गॅस सबसिडी सोडण्याचे अभियान मोदी यांनी सुरू केले, त्यानंतर केंद्राचे १४ हजार कोटी रुपये वाचले आहेत. त्यातून ग्रामीण भागातील गरीब महिलांना गॅसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. काळ्या पैशांवर टाच आणण्याचे काम मोदी सरकारने केले. बेनामी संपत्ती जप्त करण्याच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली.’’
भाजपामध्ये बूथवर काम करणारा कार्यकर्ताही पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो, इतर पक्षात हे दिसून येत नाही. भाजपामध्ये प्रामाणिकपणे लोकशाही माध्यमातून मोठ्या पदावर पोहचण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळेच चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान बनू शकला. सोनियांना त्यांच्या पुढच्या पिढीची चिंता आहे, तर मोदींना देशाच्या पुढच्या पिढीची चिंता असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, ‘‘तत्त्वनिष्ठा आणि परिश्रमाचा संयोग अमित शहा यांच्यामध्ये आढळतो. शहा यांनी पुस्तकामध्ये मांडलेले विचार जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.’’ रवींद्र साठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर योगेश गोगावले यांनी आभार मानले.
शहांच्या पुस्तकातून कार्यकर्त्यांना प्रेरणा
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा गेले काही दिवस देशव्यापी दौरा करीत आहेत. या दौºयामध्ये त्यांनी कार्यकर्ते व विविध स्तरांमधील लोकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी भाजपाचा इतिहास, वर्तमान वाटचाल मांडणारे पुस्तक लिहिले आहे. यामुळे कार्यकर्त्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल. इतर पक्षांचे कार्यकर्ते, विश्लेषक यांनीही हे पुस्तक वाचल्यास भाजपाविषयी असलेले त्यांचे गैरसमज दूर होतील. लोकशाहीची स्थिती काय, विचारधारा काय, काम कसे केले या ३ मुद्द्यांवर राजकीय पक्षांच्या कामगिरीचे मूल्यमापन व्हावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.