बोर अभयारण्यातील वाघांची संख्या घटली

By Admin | Published: October 24, 2014 03:52 AM2014-10-24T03:52:08+5:302014-10-24T03:52:08+5:30

वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्याला अलीकडेच वाघांसाठी राखीव, म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

The number of tigers in Bore Wildlife Sanctuary declined | बोर अभयारण्यातील वाघांची संख्या घटली

बोर अभयारण्यातील वाघांची संख्या घटली

googlenewsNext

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्याला अलीकडेच वाघांसाठी राखीव, म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, त्याचवेळी या अभयारण्यातील वाघांची संख्या सात वर्षांपासून सतत खालावत असल्याचे भीषण वास्तव उजेडात आले आहे़
सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारांतर्गत याबाबतची माहिती मागवली होती़ त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या माहितीतून हा खुलासा झाला आहे. वन विभागाच्या माहितीनुसार गत २००७ मध्ये बोर व न्यू बोर अभयारण्यात एकूण सहा वाघांचा अधिवास होता. यानंतर २००८ ते २०११ दरम्यान येथील वाघांची प्रगणना होऊ शकली नाही. त्यामुळे या काळातील आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. परंतु २०१२ मध्ये झालेल्या प्रगणेत येथील वाघांची संख्या सहावरून पाच झाली आहे. शिवाय २०१४ मध्ये ती पुन्हा खाली घसरून, आता केवळ चार वाघ येथे शिल्लक राहिले असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचवेळी वन्यजीव विभाग मात्र मागील दोन वर्षांत बोर व न्यू बोर अभयारण्यात फार मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याचा ढिंडोरा पिटून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे.
जर या अभयारण्यात वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धनासंबंधी एवढी विकास कामे झाली, तर वाघांची संख्या कमी का होत आहे? असा वन्यजीवप्रेमी संघटनांतर्फे सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे नागपूरशेजारच्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील वाघाच्या संख्येत वाढ होऊन, सध्या येथे एकूण चार वाघांचा अधिवास असल्याचे वन्यजीव विभाग सांगत आहे.
गत २००७ च्या प्रगणनेनुसार उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात एकही वाघ नव्हता. परंतु २०१३ मध्ये येथील वाघांची संख्या तीनवर पोहोचली आणि २०१४ मध्ये त्यात पुन्हा एका वाघाची भर पडून ती चार झाली आहे. तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पात एकूण २३ वाघ असल्याचा दावा करण्यात आला आहे.
यात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल आठ वाघांची भर पडली आहे. २०१३ मध्ये येथे एकूण १५ वाघ होते. परंतु आता ती संख्या २३ वर पोहोचली असल्याचे पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The number of tigers in Bore Wildlife Sanctuary declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.