शासनाकडे नोकरी मागणाऱ्या बेरोजगारांची संख्या घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 08:57 AM2021-11-29T08:57:12+5:302021-11-29T08:59:00+5:30
Job News: पूर्वी दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये जाऊन नावाची नोंदणी करून घ्यायचा. त्यावेळी शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांमध्ये मनुष्यबळाची गरज असेल तर एम्प्लॉयमेंट ऑफिसच्या माध्यमातून बेरोजगारांच्या याद्या पुरवल्या जायच्या.
नागपूर : पूर्वी दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये जाऊन नावाची नोंदणी करून घ्यायचा. त्यावेळी शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांमध्ये मनुष्यबळाची गरज असेल तर एम्प्लॉयमेंट ऑफिसच्या माध्यमातून बेरोजगारांच्या याद्या पुरवल्या जायच्या. कौशल्य विकास व रोजगार विभागाच्या माध्यमातून बेरोजगारांची नोंदणी व रोजगार निर्मिती केली जाते. मात्र, अलीकडे याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. कोरोना काळात रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात म्हणून विभागाने प्रयत्न केले; पण विदर्भात नोंदणी व रोजगाराची प्राप्ती इतर विभागाच्या तुलनेत नगण्य असल्याचे दिसून येते.
कौशल्य विकास व रोजगार विभागाने बेरोजगारांना रोजगार प्राप्तीसाठी उमेदवार, उद्योजक व विविध कंपन्या यांच्यात सांगड घालण्याचे काम केले. याच माध्यमातून २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचा दावा विभागाने केला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये विभागामार्फत राज्यात विविध कंपन्या, उद्योगांमध्ये १०,६४८ बेरोजगारांना रोजगार देण्यात आला. यामध्ये सर्वाधिक रोजगार मुंबई विभागात, तर सर्वांत कमी रोजगार नागपूर विभागात मिळाला. सर्वाधिक नोंदणी मुंबई विभागात, तर सर्वांत कमी नोंदणी नागपूर विभागात झाली.
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा विभागसुद्धा आहेत. विभागाच्या माध्यमातून यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे विभागाचे महत्त्व अधिक वाढले आहे. - सुरेश दियेवार, राष्ट्रीय बेरोजगार समिती