परिचारिकांना मिळणार ‘नर्सिंग होम अॅक्ट’चे संरक्षण
By admin | Published: May 12, 2016 03:38 AM2016-05-12T03:38:38+5:302016-05-12T03:38:38+5:30
आरोग्यसेवा क्षेत्रात सध्या परिचारिकांची मोठी निकड भासू लागली आहे. नोकरीची हमी देणाऱ्या या सेवाक्षेत्राकडे वळणाऱ्या मुलीच नाही, तर मुलांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
विजय मोरे, नाशिक
आरोग्यसेवा क्षेत्रात सध्या परिचारिकांची मोठी निकड भासू लागली आहे. नोकरीची हमी देणाऱ्या या सेवाक्षेत्राकडे वळणाऱ्या मुलीच नाही, तर मुलांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी लवकरच ‘नर्सिंग होम अॅक्ट’ आणण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र राज्य खासगी नर्सिंग स्कूल अॅण्ड कॉलेजेस मॅनेजमेंट असोसिएशनला दिले आहे़
राज्यातील किमान दहा खाटांचे रुग्णालय असलेल्या ठिकाणी स्टाफ म्हणून केवळ महाराष्ट्र परिचर्या परिषद, मुंबई येथील नोंदणीकृत परिचारिकेलाच संधी देण्यात यावी, असा ठराव (नर्सिंग होम अॅक्ट) येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडण्याचा प्रस्ताव राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे दिला आहे़ येत्या हिवाळी अधिवेशनात या प्रस्तावावर धोरण ठरविण्याचे आश्वासनही शिक्षणमंत्र्यांनी दिले आहे, असे असोसिएशन(मुंबई)चे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी सांगितले.
येत्या दहा वर्षांत महाराष्ट्राला सुमारे एक लाख परिचारिकांची गरज भासणार आहे़ सद्यस्थितीतील डीएड, बीएड या शाखांतील बेरोजगारी पाहता विद्यार्थी मोठ्या संख्येने नर्सिंगला प्रवेश घेत असल्याचे दिसून येते़ या वर्षी राज्यातील नर्सिंगच्या सर्व जागा पूर्ण भरल्या गेल्या आहेत़ गेल्या दोन वर्षांत शासनाचे वैद्यकीय शिक्षण संचालनालय व आरोग्य विभागात सुमारे चार हजार परिचारिकांना नोकरी मिळाली आहे़ इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नर्सिंग महाविद्यालयांची संख्या कमी असून अभ्यासक्रमही खूप कठीण आहे़ शिक्षकांचीही कमतरता व कठीण अभ्यासक्रम यामुळे विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण कमी आहे़ यामुळे अभ्यासक्रमात सुधारणा केल्यास उत्तीर्णतेचे प्रमाण वाढेल व परिचारिकांची गरजही पूर्ण शकते, असे खासगी नर्सिंग स्कूल अॅण्ड कॉलेजेस मॅनेजमेंटचे म्हणणे आहे़