परिचारिकांच्या संपाचा रुग्णसेवेवर परिणाम
By admin | Published: June 16, 2016 03:08 AM2016-06-16T03:08:43+5:302016-06-16T03:08:43+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागातील अन्यायकारक बदल्या, परिचारिकांची शेकडो रिक्त पदे, बदामी रंगाचा गणवेश या संदर्भात आदेश न काढल्याने, राज्यातील सरकारी रुग्णालयांतील २० हजार परिचारिकांनी
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील अन्यायकारक बदल्या, परिचारिकांची शेकडो रिक्त पदे, बदामी रंगाचा गणवेश या संदर्भात आदेश न काढल्याने, राज्यातील सरकारी रुग्णालयांतील २० हजार परिचारिकांनी बुधवारी एकदिवसीय संप पुकारला होता, पण परिचारिकांशी सरकारतर्फे कोणीही चर्चा न केल्याने बेमुदत संप पुकारण्याचा इशारा राज्य सरकारी परिचारिका संघटनेने दिला.
मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, सेंट जॉर्ज, कामा आणि राज्य कामगार विमा योजनेतील सर्वच रुग्णालयांमध्ये बुधवारी परिचारिकांनी कामबंद आंदोलन केले. या रुग्णालयांतील नियमित शस्त्रक्रिया रद्द, तर इर्मजन्सी शस्त्रक्रियांचे प्रमाणही अत्यल्प होते.
रिक्त पदे भरावीत, परिचारिकांना रुग्णसेवेशिवाय अन्य कोणतीही कामे लावू नयेत, रजेत सवलत देणे, हक्काचे निवृत्तीवेतन मिळावे, केंद्राप्रमाणे वेतन भत्ते, सरकारी निवासाची सोय असावी, या मागण्यांसाठी परिचारिकांनी संप पुकारला होता.
जे.जे.त विद्यार्थी परिचारिका, निवासी डॉक्टर हे वॉर्डमध्ये काम करत होते. काही इर्मजन्सी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. कामा रुग्णालयात बुधवारी फक्त चार सिझेरियन झाली, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)