अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे पोषण आहार बंद, स्तनदा माता, कुपोषित बालकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 04:53 AM2017-09-13T04:53:37+5:302017-09-13T04:53:37+5:30
राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील २५०० अंगणवाडी केंद्रातील ८० हजारांपेक्षा अधिक बालकांसह सहा हजारांवर गर्भवती आणि स्तनदा मातांना दिला जाणारा पोषण आहार पुरवठा बंद आहे. त्याचा फटका अतिसंवेदनशील मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्याला बसणार आहे.
परतवाडा (अमरावती) : राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील २५०० अंगणवाडी केंद्रातील ८० हजारांपेक्षा अधिक बालकांसह सहा हजारांवर गर्भवती आणि स्तनदा मातांना दिला जाणारा पोषण आहार पुरवठा बंद आहे. त्याचा फटका अतिसंवेदनशील मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्याला बसणार आहे.
सोमवारपासून हा संप सुरू झाला. आदिवासी मुले नेहमीप्रमाणे केंद्रात हातात ताट घेऊन आले़ केंद्राला कुलूप पाहून परत गेली. धारणी व चिखलदरा तालुक्यात ४८२ अंगणवाडी केंद्र असून ३५ हजार मुले-मुली आहेत. पैकी २ हजारावर बालके ३ ते ६ वयोगटातील आहेत. त्यांना दररोज अंगणवाडी केंद्रातून मुगाची उसळ, तूर डाळ, तांदळाची खिचडी, अंडी दिली जातात. कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने शासनातर्फे आदिवासी बालकांची विशेष काळजी घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. संप न मिटल्यास कुपोषित बालकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
सहा हजार मातांना फटका : गर्भवती आदिवासी तसेच स्तनदा मातांसाठी मेळघाटात ‘अमृत आहार योजना’ राबविली जाते. धारणी व चिखलदरा तालुक्यांत सहा हजारांवर गर्भवती आणि स्तनदा माता आहेत. त्यांना या योजनेंतर्गत वरण, भात, भाजी, पोळी, अंडी, शेंगदाणा लाडू आदी आहार दिला जातो. सोमवारपासून हा पोष्टीक आहार बंद झाला आहे.