पोषण आहारात काळाबाजारात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निशाणा
By Admin | Published: August 27, 2016 11:24 PM2016-08-27T23:24:33+5:302016-08-27T23:24:33+5:30
शालेय पोषण आहारातील काळाबाजार प्रकरणात मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता जि.प. प्रशासनाने या यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २७ - शालेय पोषण आहारातील काळाबाजार प्रकरणात मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता जि.प. प्रशासनाने या यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. येत्या शिक्षक दिनी म्हणजेच ५ सप्टेंबरला प्रशासनाने बजावलेल्या नोटीसवर खुलासा देण्याची मुदत संपत आहे. त्यानंतर दोषींवर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे संकेत शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पोषण आहार प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने चौकशीचा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. या अहवालात मुख्याध्यापकांपासून केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी ते थेट शालेय पोषण आहार अधीक्षक व गटशिक्षणाधिकारी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. पोषण आहाराच्या यंत्रणेतील अधिकारी असलेले अधीक्षक व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली नसती; तर कदाचित हा काळाबाजार झाला नसता. परंतु त्यांनी हलगर्जीपणा केल्यानेच हा गैरव्यवहार सुरू होता, असा निष्कर्ष जि.प. प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला आहे.