पोषणनिधीचे कुपोषण
By Admin | Published: October 19, 2016 03:55 AM2016-10-19T03:55:12+5:302016-10-19T03:55:12+5:30
पालघर जिल्ह्याला कुपोषणाचा लागलेला डाग पुसून काढण्यासाठी देण्यात आलेला पोषण आहार निधी अपुरा पडत असून
पालघर : पालघर जिल्ह्याला कुपोषणाचा लागलेला डाग पुसून काढण्यासाठी देण्यात आलेला पोषण आहार निधी अपुरा पडत असून अंगणवाडी सेविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे, त्याचे व त्यांना शासनाकडून मिळत असलेल्या सापत्न वागणूकीचे पडसात रविवारी चहाडे येथील अंगणवाडी सेविकांच्या निर्धार मेळाव्यात उमटले.
अंगणवाडी सेविकेचा मागील चार महिन्यांचे मानधन मिळाले नसून एन दिवाळीच्या तोंडावर त्यांच्या कुटुंबाची दिवाळी अंधारात जाण्याची चिन्हे आहेत. अनेक जबाबदाऱ्या दिल्या जात असताना इमारत नाही, मदतनीस नाही अशा परिस्थितीत कामे तरी कशी करायची असा प्रश्न त्यांनी निर्धार मेळाव्यात व्यक्त केला आहे.
स्तनदा माता, मुलांच्या आहाराचे अन्न शिजविण्यास सोयीसुविधा नसल्यामुळे जास्त वेळ खर्ची पडतो. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो. तसेच कुपोषित बालकांना देण्यात येणारी औषधेही आरोग्य विभागाकडून वेळेवर देण्यात येत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुलांच्या शैक्षणिक साहित्यासह इतर साहित्य पंचायत समितीमधील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातून डोक्यावर वाहून स्टेशनपर्यंत नेणे थांबवावे, अपुऱ्या मानधनात वाढ करावी, निवृत्ती वेतन मिळावे, भाऊबीजेच्या रक्कमेत वाढ करावी, मदतनीसची संख्या वाढावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. (वार्ताहर)
>एका मुला मागे
४ रुपये ९२ पैसे
पोषण आहार शिजविण्यासाठी इमारतीची व्यवस्था नसल्याने पोषण आहार शिजवायचा तरी कसा? असा प्रश्न उपस्थित करून उकडलेल्या अंड्यासाठी पाच रुपये आणि भाकरी, भात, वरण, भाजी आदीसाठी अवघे २५ रुपयांचे अपुरे अनुदान दिले जात असल्याने बालकांना पुरेसा पोषण आहार पुरविण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. एका मुला मागे ४ रुपये ९२ पैसे करणावळीचा दर सन २००६ पासून महागाईमध्ये वाढ होऊनही कायम असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.