होडी वल्हवित दुर्गम भागात पोहचवला पोषण आहार, सातपुड्याच्या Relubai Vasave यांची धाडसी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 07:57 AM2021-10-10T07:57:35+5:302021-10-10T07:58:25+5:30

Relubai Vasave: कोरोनाच्या काळात अंगणवाड्या बंद असल्याने कार्यक्षेत्रातील कुपोषित बालके, गरोदर आणि स्तनदा मातांची या सेविकेने खऱ्या अर्थाने सेवा केली.

Nutritious food delivered to remote areas by boat, Brave performance of Relubai Vasave of Satpuda | होडी वल्हवित दुर्गम भागात पोहचवला पोषण आहार, सातपुड्याच्या Relubai Vasave यांची धाडसी कामगिरी

होडी वल्हवित दुर्गम भागात पोहचवला पोषण आहार, सातपुड्याच्या Relubai Vasave यांची धाडसी कामगिरी

Next

- रमाकांत पाटील
नंदुरबार : सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात कधी डोंगर उतारावर पायपीट करून, तर कधी नर्मदेच्या पाण्यात होडी वल्हवित कुपोषित बालकांना आहार पुरविणाऱ्या चिमलखेडी (ता. अक्कलकुवा) येथील अंगणवाडी सेविका रेलूबाई वसावे यांचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे. कोरोनाच्या काळात अंगणवाड्या बंद असल्याने कार्यक्षेत्रातील कुपोषित बालके, गरोदर आणि स्तनदा मातांची या सेविकेने खऱ्या अर्थाने सेवा केली.

चिमलखेडी हे सातपुड्यातील दुर्गम भागातील नर्मदा काठावरील ६६३ लोकवस्तीचे गाव. ते सात पाड्यांत विभागले आहे. सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात हे गाव असल्याने सातपैकी तीन पाड्यांना टापूचे स्वरूप आले आहे. तेथे नर्मदेच्या पाण्यातून होडीने अथवा बार्जने जाण्याचा एकच पर्याय. इतरही पाडे साधारणत: अंगणवाडी केंद्रापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहेत. या अंगणवाडीत शून्य ते सहा वयोगटातील १३९ बालके, १५ गरोदर माता, सात स्तनदा माता आणि ४७ किशोरी आहेत. कोरोनामुळे अंगणवाड्या बंदच असल्याने शासनाने घरपोच पोषण आहार देण्याची योजना सुरू केली होती. त्यामुळे येथे प्रत्येक बालकाच्या घरी आहार पोहोचविणे एक आव्हान होते; पण अंत:करणापासून कर्तव्याची व सेवेची जाण असल्यास कितीही अवघड काम सहज सोपे आणि आनंदाचे होते, हे येथील अंगणवाडी सेविका रेलूबाई वसावे या रणरागिणीने आपल्या कृतीतून सिद्ध केले. गेले वर्षभर त्यांनी चिमलखेडी गावातील अलिबागपाडा, डाबरपाडा आणि पिऱ्याबारपाडा या पाड्यांवर स्वत: होडी वल्हवित पोषण आहार नेऊन बालकांच्या व इतर लाभार्थींच्या घरोघरी पोहोचविला. हे काम करताना दोन-तीन वेळा त्यांच्या जीवावरही बेतले होते. इतरही चार पाड्यांवर डोंगर उताराच्या रस्त्यांवर तीन ते चार किलोमीटर पायपीट करीत आहार पोहोचविला.  

कौतुकाची थाप
सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत नित्यनियमाने त्यांचे हेच काम सुरू होते. सोनीबाई बिज्या वसावे या मदतनीसची त्यांना साथ होती. मात्र, सध्या  मदतनीस सेवानिवृत्त झाल्याने आता हा भार त्यांच्या एकट्यावर आला आहे. या कार्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासन तसेच विधिमंडळाच्या महिला बालकल्याण समितीनेही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

Web Title: Nutritious food delivered to remote areas by boat, Brave performance of Relubai Vasave of Satpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.