अवं दाजीबा, हे वागणं बरं नव्हं.

By admin | Published: February 5, 2017 01:14 AM2017-02-05T01:14:39+5:302017-02-05T01:14:39+5:30

.. फिरकी

O Daji, this behavior was not good. | अवं दाजीबा, हे वागणं बरं नव्हं.

अवं दाजीबा, हे वागणं बरं नव्हं.

Next

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या जत्रेचा हंगाम ऐन भरात आलाय. गावोगावचे मातब्बर, दिग्गज, वजनदार, किरकोळ, फुटकळ, हौसे, नवसे, गवसे वगैरे वगैरे नेते हरखलेत. आयाराम-गयारामांचं ‘मार्केट’ वधारलंय. कोल्हापूर, सांगली, साताऱ्याच्या फडातून एकच लावणी ऐकू येऊ लागलीय...
आली आली सुगी, म्हणून चालले बिगी बिगी
गोष्ट न्हाई सांगण्याजोगी,
कुणी गालावर मारली टिचकी
मला लागली कुणाची उचकी...
मग लगेच कार्यकर्त्यांचा कोरस सुरू होतो,
कुणाची ग कुणाची, ह्याची का त्याची?
कार्यकर्त्यांना फक्त ‘जुळणी’शी मतलब. नेता कुठल्या का तंबूत जाईना... आपली फर्माईश पुरी झाली पाहिजे, एवढीच त्यांची माफक अपेक्षा. काहीजण मात्र तयारीचे, हुश्शार. सकाळी एका नेत्यासोबत एका तमाशाच्या फडात, तर रात्री दुसऱ्या नेत्यासोबत दुसऱ्या फडात! फेटे बांधायचे, फोटो काढायचे अन् लगेच पंगतीला बसायचं... रस्सा-सुक्कं-भाकरी! त्यांच्या घरची पोरं मात्र खूश. कारण घरात सकाळी एका रंगाचा फेटा येतोय, तर रात्री दुसऱ्या रंगाचा!!
****
सदाभाऊ मंत्री झाल्यापासून टेचात फिरताहेत. इस्लामपुरात चहाच्या खोक्यावरच्या बाकड्यावर बसणारे, एम-८० वरून फिरणारे भाऊ ‘झायलो’त जाऊन बसले. आता ‘झायलो’, ‘इनोव्हा’ जाऊन जाऊन ‘लँडरोव्हर’ आलीय. अंगावरच्या कपड्यांना रोज खळ. कपाटात रंगीत कुर्त्यांची चळत दिसायला लागलीय. भाऊंशी जवळीक असल्याची बतावणी करणाऱ्या कोंडाळ्याचा गराडा पडू लागलाय. कुणी म्हणतं, भाऊंच्या चेहऱ्यावर तुकतुकी आलीय. आंदोलनं, मोर्चावेळी उन्हातान्हात रापलेला चेहरा आता ‘एसी’मुळं तजेलदार व्हायला लागलाय! खर्डा-भाकरीची न्याहरी जाऊन काजू-बदामाच्या डिशेश त्यांच्यासमोर दिसू लागल्यात... अन् तिकडं शेट्टीसाहेब जाम परेशान झालेत!
नेमकं दोघांत चाललंय काय, कुणालाच समजेनासं झालंय. परवा केंद्राचा अर्थसंकल्प जाहीर होताच शेट्टीसाहेब बरसले, (अलीकडं हे अंमळ जादाच वाढलंय...) ‘शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प’, असा त्यांनी घरचा आहेर दिला. मग सदाभाऊंची पंचाईत झाली. त्यात त्यांनी दुपारपर्यंत अर्थसंकल्प बघितलाच नव्हता म्हणे! मग त्यांनी ‘शेती आणि ग्रामीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प’, अशी भलावण केली. दोघांचं ऐकणारा कार्यकर्ता मात्र बावचळलाय... जत्रेचा हंगाम सुरू झाल्यापासून शेट्टीसाहेबांची माणसं सदाभाऊ आले की, ‘शिट्टी’ फुंकायची सोडून मुद्दाम एक गाणं वाजवतात...
कोण होतास तू, काय झालास तू,
अरे वेड्या, कसा वाया गेलास तू..?
****
परवा चंद्रकांतदादा, सदाभाऊ साताऱ्याला गेले. एकीकडं तिथल्या महाराजांच्या स्वतंत्र ‘राजधानी एक्सप्रेस’ला हात दाखवायचा अन् दुसरीकडं नाराज प्रवासी आपल्याच गाडीत बसवायचे, हा त्यांचा एककलमी कार्यक्रम. त्यामुळं महाराजांनी बनवलेली ‘राजधानी एक्सप्रेस’ ज्या नाराजांनी भरणार होती, ती आता साताऱ्यातच घुटमळतेय. हा कावा लक्षात आल्यावर महाराज ‘नॉट रिचेबल’ झाले. नंतर ते रेंजमध्ये आले पण चंद्रकांतदादांनी त्यांना फोन केला, तर एकच कॉलर टोन ऐकू येतेय,
पाव्हणा गालात हसतोय ग,
लई बाई लबाड दिसतोय ग...
कृष्णा-कोयनेच्या काठावर भोसल्यांनी उंडाळकर काकांचा हात सोडून मोहितेंशी परत जुळवून घेतलंय. आधीच विलासकाकांचा आपल्याच पक्षातल्या कऱ्हाडच्या पृथ्वीराजबाबांशी पंगा, पुतण्यानंही साथ सोडलेली, आता अतुलबाबा बाजूला गेले... झालं... त्यामुळं सगळीच सामसूम. कोयना संघात म्हणे गाण्यांची प्रॅक्टिस चाललीय,
बिब्बं घ्या बिब्बं, शिक्कंकाई
गल्ली-बोळातनं वरडत जाई...
अन् यावेळी विलासकाका हातावर हात चोळत खुर्चीत बसलेले असतात..!
****
हल्ली कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातल्या कुठल्याही गावात पारावरच्या गप्पा सुरू असताना बॅकग्राऊंडला कर्णा वाजत असतो,
कसं काय पाटील, बरं हाय का,
काल काय ऐकलं, ते खरं हाय का?
काल म्हणं तुम्ही, तालुक्याला गेला
‘कमळा’कडं काळीज विसरून आला...
एवढी ‘कमळा’ची महती वाढलीय. परवा बारामतीचे काका कोल्हापुरात येऊन गेले. त्यावेळी ‘कमळाबाई’शी जुळवून घेतलेली मंडळीच हारतुरे घेऊन पुढं होती, त्यांच्या स्वागताला! मानेवहिनींनी हातकणंगल्यात अन् संध्यादेवी कुपेकरांनी चंदगडात ‘कमळा’सोबत युती केलीय. त्यामुळं हसनशेठ कागलकरांचा तिळपापड झालाय. त्यातच कागलकरांकडून दुखावल्या गेलेल्यांना गोंजारून ‘कमळा’च्या तंबूत पाठवण्याचा सपाटा मुन्नाभाईनं लावलाय. यावर बारामतीकर काका सगळ्यांचे कान उपटतील, अशी कागलकरांची अपेक्षा. पण हाय रे! काकांनी मूक संमतीच दिली ‘कमळाबाई’शी घरोब्याला! (नाहीतरी ही बडी मंडळी कायमची रूसून गेली, तर आपल्या तंबूच्या चिंध्या होतील, हे काकांना कुणी सांगायची गरज आहे का..?)
इचलकरंजीच्या आवाडेंचं हातकणंगल्यात कुणी ऐकलं नाही. मग काय आवाडेंनी सगळीकडं आपली माणसं उभी केली! गजहब झाला. त्यावर काल म्हणे आवाडेंकडं कुरीयर आलं. त्यांनी ते फोडलं, तर आत फक्त एक चिठ्ठी.
अवं दाजीबा, गावात होईल शोभा,
हे वागणं बरं नव्हं...
एवढंच त्यावर लिहिलेलं. त्यांना शंका आली जयवंतराव आवळेंची, पण अक्षर तर दिसत होतं, पी. एन. पाटलांसारखं! हो... ‘पी.एन.’ची चिठ्ठ्या पाठवायची जुनी सवय आवाडेंना आठवली. मागं नाही का विलासराव देशमुखांकडं ते अशाच चिठ्ठ्या पाठवायचे!!
****
जाता-जाता : बारामतीकरांचा राज्यभरातला तट सांभाळणाऱ्या तटकरेंनी घसा खरवडून सांगूनही व्हायचं तेच झालं. पलूस-कडेगावात अरुणअण्णा लाड यांनी पृथ्वीराजबाबा देशमुखांशी पुन्हा ‘याराना’ सुरू केला. कमळाबाई अन् बारामतीकरांचे फडकरी एकत्र झालेत. अर्थात तिथं टिकायचं तर या दोघांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळं अण्णांनी बाबांसाठी पायघड्या घातल्या... अत्तरदिवं लावलं... अन् सुरू झाली फर्मास लावणी,
या रावजी, तुम्ही बसा भावजी,
कशी मी राखू तुमची मरजी...
हो बसा भावजी...
वळक तुमची धरून मनी,
काय करू सांगा तुमची अरजी...


श्रीनिवासल नागे

 

Web Title: O Daji, this behavior was not good.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.