“मनोज जरांगेंनी २८८ जागांवर उमेदवार उभे करावेत, आम्ही स्वागतच करू”; लक्ष्मण हाकेंचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 01:26 PM2024-10-14T13:26:24+5:302024-10-14T13:29:36+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Politics: मनोज जरांगे यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. एक ते दोन जागांवरही ते उमेदवार देणार नाहीत, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Politics: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कधी लागणार, निवडणुका कधी होणार आणि मतमोजणी कधी असेल, याकडे आता राज्याचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. सर्वच पक्षांनी तयारीवर मोठा भर दिला असून, जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी निवडणुकीत कितपत प्रभाव पाडू शकेल, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यातच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे यांनी दसरा मेळावा घेतला. तर, ओबीसी आरक्षण टिकावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे लक्ष्मण हाके यांनी पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात सहभागी झाले.
मीडियाशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे तुम्ही सत्तेत कधी नव्हता, तुम्ही सत्ताधारी आहात, कारखानदार आहात, तुम्ही महाराष्ट्रात दरोडे घातलेले आहेत. तुमच्याकडे प्रत्येक तालुक्याला दोन-चार सरदार, वतनदार, पैसेवाले कारखानदार आले कुठून, आमचे ओबीसी बांधवांचे टॅक्स रुपाने जे पैसे या महाराष्ट्राच्या तिजोरीत जमा होतात, ते सगळे लुटण्याचे काम जरांगे यांच्या हस्तकांनी केले आहे. त्याच माणसांनी जरांगे यांच्या मेळाव्याला माणसे पुरवली, वाहने पुरवली, झेंडे पुरवले. मनोज जरांगे यांनी २८८ जागांवर उमेदवार उभे करावेत, २८८ दरोडेखोरांना पराभूत करावे. आम्ही स्वागत करू. परंतु, जरांगे एक ते दोन जागांवरही उमेदवार देणार नाहीत, असे सांगत लक्ष्मण हाके यांनी आव्हान दिले.
मनोज जरांगे यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते
शरद पवार यांचे ऐकणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऐकणे, आमदार-खासदारांचे ऐकणे, या पलीकडे जरांगे यांच्या मेळाव्याचा कोणताही हेतू नव्हता, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. मनोज जरांगे यांना अक्कल नाही. आरक्षणाबाबत काही माहिती नाही. सल्ला घेऊन तरी बोलत जा. मनोज जरांगे यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असा खोचक टोला हाके यांनी लगावला.
दरम्यान, राजसत्ता ही अंतिम असते. ओबीसींना राजकारण करता आले नाही, यामुळे मोठे नुकसान झाले. ओबीसींना एकत्रित येऊन आपली माणसे निवडता आली नाहीत. आम्ही ओबीसींना एकत्र करू शकलो, तर प्रत्येक तालुक्याचे सरदार, वतनदार, मटकावाले, दोन नंबर धंदेवाले, कायम निवडून येणारे आमदार, खासदार हे जर लायक आणि सामाजिक न्यायावर बोलणारे असते तर ओबीसींवर ही वेळ आली नसती. मतपेटीतून आपले उपद्रव मूल्य दाखवून द्या, असे आवाहन करू, असे हाके म्हणाले.