“उपमुख्यमंत्री नाही, पंकजा मुंडे CM बनतील, भाजपाला जुने दिवस परत येतील”: लक्ष्मण हाके
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 01:18 PM2024-07-25T13:18:34+5:302024-07-25T13:18:56+5:30
Laxman Hake News: याचसाठी केला होता अट्टाहास, भाजपाने तेवढे धारिष्ट्य दाखवले तर पुन्हा चांगले दिवस येतील, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
Laxman Hake News: भाजपाने पंकजा मुंडे यांना बीड येथून लोकसभेची उमेदवारी दिली होती. परंतु, अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर भाजपाने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या रिंगणात उतरवले. त्यात पंकजा मुंडे यांचा विजय झाला. यानंतर आता पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर भाजपाला जुने चांगले दिवस परत येतील, असे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
कुणबी नोंदी रद्द कराव्यात. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये. ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, यासाठी लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत. मीडियाशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी पंकजा मुंडे या मुख्यमंत्री होण्याबाबत स्पष्ट शब्दांत विधान केले. उपमुख्यमंत्री वगैरे कशाला काय, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे आहे. महाराष्ट्रातील अठरा पगड जातीची लोक एकत्र आले आणि आंबेडकरी जनतेने थोडा टेकू लावला ना, मुस्लिम बांधवांना कळून चुकले आहे की, आपण लोकसभेला काय केले. त्याचे प्रत्यंतर विशाळगड प्रकरणात आले आहे. त्यामुळे माणसे वास्तवाला सामोरे जातील. एक समर्थ पर्याय महाराष्ट्रात उभा करू, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
....तर महाराष्ट्रात ओबीसी मुख्यमंत्री होऊ शकतो
पंकजा मुंडे आमदार नव्हत्याच. त्यावेळेसही त्या लोकनेत्या होत्या. पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाला, तरी त्या लोकनेत्याच आहेत. कारण त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. मी घराणेशाही वगैरे बोलत नाही. पंकजा मुंडे यांच्यात तेवढी क्षमता आहे. सत्तेच्या सारीपाटात सत्तेची गणिते जुळवण्यासाठी कोणी खटपटी करत असेल. खरा महाराष्ट्र उभा राहिला, तर महाराष्ट्रात ओबीसी मुख्यमंत्री होऊ शकतो, हे विश्वासाने सांगतो, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्यास भाजपाला पुन्हा चांगले दिवस येतील. असे झाले तर महाराष्ट्र परत वाड्या-वस्त्यांवर जाऊ शकतो. महाराष्ट्रातील कमळ वाड्या-वस्त्यांवर डोंगर-दऱ्यांमध्ये फुलू शकते. तेवढे धारिष्ट्य आणि धैर्य भाजपा दाखवणार असेल, तर आम्ही याचसाठी केला होता अट्टाहास, बाकी सगळे समजुतदार आहात, असे सूचक विधान लक्ष्मण हाके यांनी केले.