“...तर शरद पवार ४ ते ५ वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 07:06 PM2024-08-28T19:06:02+5:302024-08-28T19:06:13+5:30
Laxman Hake On Sharad Pawar News: लक्ष्मण हाके म्हणाले की, शरद पवारांना निवडणुका जिंकण्याचे व्याकरण कळले, पण...
Laxman Hake On Sharad Pawar News: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला चार ते पाचवेळा गेले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाबद्दल त्यांनी एकही शब्द काढला नाही. मग अशा माणसाला तुम्ही कधी धडा शिकवणार काय? मराठा आरक्षणाच्या नावाखाली मनोज जरांगे पाटील संपूर्ण राज्याला वेठीला धरत आहेत, अशी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली.
एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असताना दुसरीकडे आरक्षणाचा मुद्दाही तापताना दिसत आहे. मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि ओबीसीतून मराठा आरक्षण देऊ नये, ही मागणी लावून धरणारे लक्ष्मण हाके हे दोन्ही आंदोलक आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. दोन्ही आंदोलक नेते राज्यातील विविध ठिकाणी जाऊन बैठका, सभा घेत आहेत. लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
...तर शरद पवार ४ ते ५ वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते
एका मेळाव्यात बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, राष्ट्रवादीचे शरद पवार यांना निवडणुका जिंकण्याचे व्याकरण कळले. पण ओबीसीतील अठरापगड जातीचे अंतःकरण कळले नाही. ते समजले असते तर शरद पवार ४ ते ५ वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते, असा टोला लगावत, नांदेड जिल्ह्यातून पाच ओबीसी आमदार विधानसभेत पाठवा, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील मराठा-ओबीसी वाद लावण्याचे काम करत आहेत. कुणालाही आमच्या हक्कावर गदा आणू दिली जाणार नाही, महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी लक्ष्मण हाकेंनी दिली.