आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 03:32 PM2024-09-19T15:32:12+5:302024-09-19T15:33:56+5:30
Laxman Hake Tauts Manoj Jarange Patil: मनोज जरांगेच्या बॅनरवर फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो लागलेला दिसतो का, असा थेट सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
Laxman Hake Tauts Manoj Jarange Patil: आगामी विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तसा राज्यात आरक्षणाचा वाद वाढताना पाहायला मिळत आहे. सगेसोयरे विषय तसेच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. तर ओबीसी आरक्षण वाचावे, यासाठी आंदोलन करत असलेले लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. काही ओबीसी आंदोलकांनी वडीगोद्री येथे उपोषणास सुरुवात केली आहे.
एकीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असून, दुसरीकडे मंगेश ससाणे आणि आंदोलकांचे सगेसोयरे अधिसूचना रद्द करावी, कुणबी दाखल्याद्वारे होत असलेली घुसखोरी थांबवावी या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. यातच आता लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना खोचक टोला लगावला आहे.
मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या
मनोज जरांगे प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी करत आहेत. जरांगेंना तुमच्या बिगबॉस मध्ये घ्या अशी माझी बिग बॉसच्या लोकांना मागणी आहे. यापेक्षा जरांगेंची कुठेही लायकी नाही, अशी बोचरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. जरांगेच्या बॅनरवर फुले शाहू आंबेडकरांचा फोटो लागलेला दिसतो का? असा सवालही त्यांनी केला. जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री जीआर काढतात याची लाज वाटते. हैदराबाद गॅझेट ,सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅजेट लागू करण्याची शासनाची हालचाल सुरू आहे हा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी दिला मुख्यमंत्र्याला कायदा कळतो का? असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.
दरम्यान, जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून जीआर काढणार असाल तर ओबीसींचे जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. राहुल गांधी तुम्ही ओबीसीची भाषा बोलतात. पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस अंतरवाली सराटीला जाऊन आला, त्यांनी ओबीसींच्या भावना ऐकून घ्याव्यात, अशी टीका हाके यांनी केली.