Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचे टेन्शन वाढले! शहाजीबापू पाटलांना पर्याय सापडला? उद्धव ठाकरे बांधणार शिवबंधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 11:26 AM2022-08-03T11:26:00+5:302022-08-03T11:28:19+5:30
Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून अनेकविध पर्यायांची चाचपणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. तर, शिवसेनेतील गळती थांबता थांबत नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना वाचवण्याचा मोठा पेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर आहे. यातच आता उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांना पर्याय शोधत असल्याचे सांगितले जात आहे. शहाजी बापू पाटील यांना तगडी टक्कर देऊ शकणारा एक बडा नेता शिवसेनेत प्रवेश करत असून, खुद्द उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार असल्याचे सांगितले जात आहे.
काही दिवसांपूर्वी आंबेडकरवादी नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. लगेचच त्यांना शिवसेनेचे उपनेते पद देण्यात आले होते. आता ओबीसी चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेले लक्ष्मण हाके हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. लक्ष्मण हाके यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शिवसेनेकडून शहाजीबापू पाटील यांनी देशमुखांना पराभूत केले. आता आगामी निवडणुकीत लक्ष्मण हाके शहाजीबापू पाटलांना चांगली टक्कर देण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यासोबत बैठक होणार असून त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लक्ष्मण हाके शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
कोण आहेत लक्ष्मण हाके?
लक्ष्मण हाके सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवारी आहेत. पुणे विद्यापीठातून एमएचे शिक्षण झाले आहे. माणदेश ऊसतोड कामगारांसाठी संघर्ष, धनगर समाज आरक्षण लढ्यातील प्रमुख नेते आहेत. तसेच फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही केले आहे. ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष आहेत. तर, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष आहेत. लक्ष्मण हाके यांनी मागील वर्षभरात अनेक ओबीसी मोर्चे आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. याशिवाय ते राज्य मागास आयोगाचे सदस्य आहेत.