भुजबळांच्या सुटकेसाठी नाशिकमध्ये ओबीसी मोर्चाची सांगता
By admin | Published: October 3, 2016 11:54 AM2016-10-03T11:54:39+5:302016-10-03T16:09:44+5:30
राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी शहरात ओबीसी मोर्चा काढण्यात आला.
Next
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 3 - मराठा क्रांती मोर्चा प्रमाणेच विक्रमी गर्दीचा उच्चांक करीत आज ओबीसी समाजाच्या वतीने नाशिक इथं भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले. ओबीसींचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर चौकशीच्या निमित्ताने अन्याय केला जात असल्याचा भुजबळ समर्थक नेत्यांचा दावा असून भुजबळ यांना जाणीवपूर्वक जामीन मिळू दिला जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्याच्या निशेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला आज दुपारी साडेबारा वाजता पंचवटी भागातील तपोवन येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुकमोर्चाला प्रारंभ करण्यात आला.
महिला आणि अपंग अग्रभागी तर त्यानंतर वकील आणि समाजबांधवांबरोबर नेते सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यध्यक्ष जितेंद्र आव्हाड तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आदींसह अन्य नेते सहभागी होते. तपोवन पंचवटी मार्गे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात पिवळे ध्वज घेऊन मोर्चेकऱ्यांनी मी भुजबळ असे लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. मोर्चात राज्यभरातून आलेल्या आंदोलकांबरोबरच दिल्ली, बिहार, मध्य प्रदेशसह अन्य राज्यातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भरपावसात निघालेल्या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगता झाली.
विराट मोर्चात सहभागी झालेल्या मालेगाव येथील युवक दिपक बागुल याने माजी मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिमा आपल्या पाठीवर गोंदवून घेतली आहे.