“ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या लोकांचा, काही पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम”: नवनाथ वाघामारे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 06:52 PM2024-07-03T18:52:47+5:302024-07-03T18:58:57+5:30
Navnath Waghmare News: दिशाभूल, प्रसिद्धीसाठी त्यांच्यापैकीच कुणीतरी असे प्रकार घडवून आणत असेल. मनोज जरांगे पाटील यांना भीती वाटत असेल, तर संरक्षण घ्यावे, असे नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे.
Navnath Waghmare News: ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अंतरवाली सराटी गावात आणि मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या परिसरात ड्रोनद्वारे टेहळणी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकारची तक्रार ग्रामस्थांनी पोलिसांत केली आहे. मनोज जरांगे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही केली जात आहे. यावरून ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी आंदोलन करणारे आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मोठा दावा केला आहे.
पत्रकारांशी बोलताना नवनाथ वाघमारे म्हणाले की, हा हास्यास्पद विषय आहे. मनोज जरांगे पाटील वेगळे काही करत आहेत का, ते तिथे उपोषणाला बसले असतील किंवा कुठे गेले असतील, ड्रोन फिरले म्हणून काय मोठे झाले, अशी विचारणा नवनाथ वाघमारे यांनी केली. ड्रोनने पाहणी केली तर काय फरक पडतो. आम्ही जिथे थांबतो, तिथेही ड्रोन पाहणी केली तरी काय फरक पडणार आहे. हे कृत्य खोडसाळपणाचे आहे आणि त्यांच्यातील एकानेच हा कार्यक्रम केलेला असू शकतो. आमच्या नेत्यांना सुरक्षा मिळावी, या मागणीसाठी कुणीतरी जाणीवपूर्वकही असे केलेले असू शकते. त्यांच्या नेत्यांना सुरक्षा आहे, आम्ही गरिबाची लेकरे आहोत. आम्हाला सुरक्षा नाही, असे नवनाथ वाघमारे म्हणाले.
आमच्याकडे राज्य सरकारचे लक्ष नाही
आम्ही छोट्या समाजातून येतो, त्यामुळे आमच्याकडे राज्य सरकारचे लक्ष नाही. आम्हालाही धमकी आली होती. आमच्या कार्यकर्त्यांनीही मागणी केली होती. परंतु, अद्याप आम्हाला साधी सुरक्षा नाही. त्यांना तरी चांगली सुरक्षा आहे. ड्रोन हा काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रोग्राम आहे. ओबीसीतील कोणताही नेता असे काम करू शकत नाही. अशी कामे करायला वेळ कुणाकडे आहे. प्रसिद्धीसाठी जवळचा कुणीतरी असे प्रकार घडवून आणत असेल. काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी केलेले हे काम आहे, असा मोठा दावा नवनाथ वाघमारे यांनी केला.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना सरकार सुरक्षा पुरवणार असेल, तर आमचा विरोध असण्याचे काही कारण नाही. जरांगे यांना भीती वाटत असेल, तर त्यांनीही संरक्षण घ्यायला हवे. ओबीसींकडून त्यांना कोणतीही भीती नाही. परंतु, त्यांच्याच माणसांकडून त्यांना भीती असेल. कारण मागे १०० ते २०० कोटींचा त्यांच्यात काय भ्रष्टाचार झाला आहे. त्यातून त्यांचा वाद निर्माण झालेला आहे. यापैकीच कोणीतरी हा ड्रोनचा विषय त्यांचेच कार्यकर्ते घडवून आणत असतील. त्यातून जरांगे पाटील यांना भीती वाटायला लागली असेल. भीती वाटत असल्यास संरक्षण घ्यावे. यासाठी आम्ही विरोध करणारे कोण, असे नवनाथ वाघमारे म्हणाले.