महाविकास आघाडी सरकारमुळेच ओबीसी आरक्षण गेले : फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 10:13 AM2021-06-04T10:13:34+5:302021-06-04T10:13:55+5:30
कोरोनाचा आढावा घेण्यासाठी फडणवीस हिंगोलीत
हिंगोली : राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करून ठोस माहिती सादर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आठ वेळा तारीख वाढवून घेतली. मात्र काहीच केले नाही. त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुकांतील ओबीसींचे सगळेच आरक्षण गेल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला.
कोरोनाचा आढावा घेण्यासाठी फडणवीस हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. ते म्हणाले, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने तेवढ्याच जागांचा प्रश्न होता. मात्र राज्य शासनाने माहिती सादर न केल्याने नजीकच्या निवडणुकांत ओबीसीला आरक्षण जागा राहणार नाहीत. हा प्रश्न सुटेपर्यंत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
राज्य शासनाने शहराच्या दर्जाप्रमाणे कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालयाची देयके भरण्याबाबत आदेश काढले. यापेक्षा महात्मा फुले जनआरोग्यमध्ये सरसकट रुग्णालयांना सक्ती करणे गरजेचे होते. औरंगाबाद खंडपीठातील याचिकेप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे देयके सादर करून महात्मा फुले योजनेतून परत करायची आहेत. मात्र ती स्वीकारली जात नाहीत. अशा वेळी स्पीड पोस्टने पाठवून पुरावे ठेवा, याबाबत पुन्हा दाद मागू, असेही फडणवीस म्हणाले.
‘शस्त्रक्रियाही मोफत करा’
nम्युकरमायकोसिसच्या रुग्णांना रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करावी लागते. त्यालाही आठ ते दहा लाखांचा खर्च येतो. विद्रूपता दिसू नये म्हणून या शस्त्रक्रियाही मोफत करून देण्याची मागणी फडणवीस यांनी केली.