जितेंद्र आव्हाड हे कंत्राटी कामगार; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 12:03 PM2022-01-04T12:03:32+5:302022-01-04T12:04:27+5:30
आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहित नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली असं पडळकरांनी म्हटलं आहे.
मुंबई – ओबीसींवर माझा विश्वास नाही असं विधान करुन मंत्री जितेंद्र आव्हाडांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. मात्र आता या विधानावरुन विरोधी पक्ष भाजपाने सत्ताधारी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ओबीसींना आपले फुटसोल्जर म्हणून वापरणारे प्रस्थापितांचे सरकार आता मात्र ओबीसींविषयी जी काही प्रेम दाखवण्याची स्पर्धा भरवतायेत ते निव्वळ हास्यास्पद व फसवं आहे अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.
गोपीचंद पडळकर(BJP Gopichand Padalkar) म्हणाले की, सुप्रीम कोर्टानं ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करेपर्यंत सरकारने केवळ दीड वर्ष नुसत्या तारखा घेतल्या. केंद्राच्या नावाने ओरड केली. आता मात्र यांची पायाखालची जमीन सरकली आहे. आत्ताही ते काय करतायेत याबद्दल कुठलीच माहिती नाही. राज्य मागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे? ओबीसी उपसमिती कुठे आहे? इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू केलंय का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असताना मात्र या सरकारचे मंत्री मोठमोठ्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही, कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहित नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली. शेकडो ओबीसींनी स्वत:ला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला? कदाचित प्रस्थापितांना खुश करण्यासाठीचे ते कंत्राटी कामगार आहेत असा टोला गोपीचंद पडळकरांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला आहे.
ओबीसींना आपले फुटसोल्जर म्हणून वापरणाऱ्या प्रस्थापितांच्या सरकारचं #OBC प्रेम फसवं आहे.#OBC वर तुम्हाला प्रेम असेल तर @BJP4Maharashtra सर्वच जागेवर #OBC उमेदवार देणार आहे,त्यांना निवडूण द्या.अन्यथा तुम्हीही फक्त #OBC उमेदवार देणार,असे तरी जाहीर करा.@AjitPawarSpeaks@NCPspeakspic.twitter.com/NwQ6Ta7pBA
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) January 4, 2022
दरम्यान, दुसरीकडे अजित पवार(Ajit Pawar) म्हणतात इम्पिरिकल डेटा गोळा होईपर्यंत निवडणूका आम्ही घेणार नाहीत. वेळ पडली तर प्रशासक नेमू म्हणजेच आपल्या मर्जीतील अधिकारी प्रशासक म्हणून नेमायचे आणि स्थानिक संस्थेवरही डल्ला मारायचा, हाच हेतू दिसतोय असा आरोप करत ओबीसींवर तुम्हाला एवढच प्रेम असेल तर भारतीय जनता पक्ष सर्वच ठिकाणी फक्त आणि फक्त ओबीसी उमेदवार देणार आहे, त्यांना आपण निवडूण द्यावे. अन्यथा तुम्हीही फक्त ओबीसीच उमेदवार देणार आहात, असे तरी जाहीर करावे असं आव्हानही पडळकरांनी महाविकास आघाडीला दिलं आहे.