OBC Reservation : ओबीसी आरक्षणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 07:07 AM2021-12-17T07:07:31+5:302021-12-17T07:07:38+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. केंद्र सरकारच्या भूमिकेमुळेच मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसी आरक्षण रद्द झाल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. ठाकरे सरकारने दृष्टिहिन, दिशाहिन, बुद्धिहिन भूमिका घेतल्यानेच हे आरक्षण रद्द झाल्याचे भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले.
चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकार इम्पिरिकल डेटा द्यायला तयार नाही, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करायला तयार नाही, राज्यांना सहकार्य करण्याची त्यांची मानसिकता नाही, यातून केंद्र सरकारला आरक्षण टिकवायचे आहे की नाही, अशी शंका निर्माण होते. शेलार पत्रपरिषदेत म्हणाले की, ठाकरे सरकारच्या हेकेखोरपणामुळे ओबीसी आरक्षणाचा खून झाला.
बसपा करणार आंदोलन
महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसी आरक्षण गेल्याची टीका बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी केली. सरकारच्या निषेधार्थ २२ डिसेंबरपासून बसपा राज्यभर आंदोलन करेल, असे त्यांनी जाहीर केले.