OBC Reservation: फडणवीस आणि शिंदेंनी असं काय केलं की महिनाभरात ओबीसी आरक्षण मिळालं? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 03:20 PM2022-07-20T15:20:37+5:302022-07-20T15:21:46+5:30
OBC Reservation: राज्यातील ओबीसींच्या २७ टक्के राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आनंद व्यक्त केला आहे. ठाकरे सरकार गेलं आणि शिंदे-फडणवीस सरकार आलं म्हणूनच ओबीसी आरक्षण मिळालं, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाणे.
नागपूर - सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसींच्या आरक्षणाबाबत आज मोठा निर्णय दिला आहे. महाराष्ट्रातील ३६७ ठिकाणी बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. दरम्यान, राज्यातील ओबीसींच्या २७ टक्के राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आनंद व्यक्त केला आहे. ठाकरे सरकार गेलं आणि शिंदे-फडणवीस सरकार आलं म्हणूनच ओबीसी आरक्षण मिळालं, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाणे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग सुप्रीम कोर्टातून मोकळा झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील ठाकरे सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार आलं म्हणूनच ओबीसी आरक्षण मिळालं. ओबीसींना न्याय देतील तर ते देवेंद्र फडणवीसच देतील, असं मी आधीपासूनच सांगत होतो. आज मी त्यांचं अभिनंदन करतो. गेली अडीच वर्षे भाजपासह सर्व ओबीसी संघटनांनी, ओबीसी जनतेने संघर्ष केला, त्यामुळे आज हा मोठा विजय मिळाला आहे. मला वाटतं की, ओबीसी आरक्षणाबाबत गेली अडीच वर्ष जो वेळकाढूपणा झाला तो उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून केला गेला. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला नाही. आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताच न्याय मिळवून दिला.
दरम्यान, असं फडणवीस आणि शिंदेंनी काय केलं की ओबीसींना महिनाभरात आरक्षण मिळालं, अशी विचारणा केली असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे सत्तेत असते तर त्यांनी बांठिया आयोगाचा अहवाल सादरच केला नसता. त्यामुळे पुन्हा निवडणुका घेऊन त्यात ओबीसींना आरक्षण मिळालं नसतं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच हा अहवाल स्वीकारला आणि सर्वोच्च न्यायालयात सादर केला. त्यामुळे ओबीसींना हे आरक्षण मिळालं आहे. आता महाविकासआघाडीच्या नेत्यांनी गप्प बसावं, तुम्हाला आता जनता सोडणार नाही. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चुल्लूभर पाण्यात बुडून मरावं, असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.