संपर्क अभियानात भाजपाच्या रडारवर ओबीसीच्या ३८४ जाती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 12:25 AM2018-10-10T00:25:49+5:302018-10-10T00:26:07+5:30
ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या ३८४ जातींपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर महाराष्ट्राने देशातील पहिले ओबीसी मंत्रालय स्थापन केले.
मुंबई : ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या ३८४ जातींपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर महाराष्ट्राने देशातील पहिले ओबीसी मंत्रालय स्थापन केले. या निर्णयांचा पूर्ण फायदा उचलण्यासाठी प्रदेश ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून सर्व ३८४ जातींपर्यंत पोहोचण्याची तयारी भाजपाने चालवली आहे.
भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे सध्या राज्यभर संवाद से संपर्क अभियान सुरू आहे. या अंतर्गत मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विजय चौधरी म्हणाले की, काँग्रेसने ४० वर्षे ओबीसी समाजावर अन्याय केला. समाजाला घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ४० वर्षांपासून खितपत पडलेल्या राष्ट्रीय ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील पहिले ओबीसी मंत्रालय स्थापन केले. या निर्णयाचा ओबीसी समाजाला मोठा फायदा होणार आहे. ओबीसींचे वाढते संघटन भाजपासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे राज्यातील ३८४ जातींपैकी आपल्या शहरात असलेल्या जातींचे नेते, जातसमूहांच्या संघटना आणि त्यांच्या पदाधिकाºयांपर्यंत पोहोचायला हवे. भाजपा सरकारने ओबीसी समाजासाठी केलेले काम त्यांच्यापर्यंत पोहोचवतानाच या जातींच्या समस्या आणि मागण्याही जाणून घ्याव्यात. भविष्यात या मागण्यांबाबत सरकार पातळीवर पाठपुरावा केला जाईल, असे विजय चौधरी म्हणाले.
ओबीसी प्रवर्गात मोडणाºया प्रवर्गातील जातींचे संघटन भाजपाच्या हिताचे असले तरी या वर्गाला भाजपाशी जोडणे आवश्यक आहे. ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून या प्रत्येक संघटनेपर्यंत पोहोचायला हवे. स्थानिक नेतृत्वाच्या मदतीने बुथ स्तरापर्यंत ओबीसी मोर्चा आणि त्यातून जोडल्या जाणाºया कार्यकर्त्यांचे संघटन करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे विजय चौधरी यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत ओबीसी मोर्चाने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात संवाद से संपर्क अभियानाची सुरुवात केली आहे. आता मुंबई आणि ठाणे येथील कार्यक्रमांनंतर कोकणात अभियान सुरू करण्यात येईल.
भायखळा येथील सावित्रीबाई फुले शाळेच्या सभागृहात आयोजित या मेळाव्यास मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांच्यासह ओबीसी मोर्चाचे मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कोकणातही अभियान
मुंबई आणि ठाणे येथील कार्यक्रमांनंतर कोकणात संवाद से संपर्क अभियान सुरू करण्यात येणार असल्याचे विजय चौधरी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले.