सुसंस्कृत पुण्यात नाटकाच्या प्रयोगादरम्यान अश्लील शेरेबाजी

By Admin | Published: January 24, 2015 11:43 AM2015-01-24T11:43:57+5:302015-01-24T16:39:14+5:30

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख अभिमानाने मिरवणा-या पुण्यात 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांनी अश्लील शेरेबाजी केल्याने नाटकाचा प्रयोग थांबवण्याची नामुष्की आणली.

Obscenity in the cultured Pune experiment | सुसंस्कृत पुण्यात नाटकाच्या प्रयोगादरम्यान अश्लील शेरेबाजी

सुसंस्कृत पुण्यात नाटकाच्या प्रयोगादरम्यान अश्लील शेरेबाजी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २४ - 'महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी' अशी ओळख मिरवणा-या पुण्यात एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांनी अश्लील शेरेबाजी केल्याने नाटकाचा प्रयोग थांबवण्याची नामुष्की आली. चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस' या नाटकाचा काल शुक्रवारी पुण्यातील बार काऊन्सिल असोसिएशने टिळक स्मारक मंदिरात प्रयोग आयोजित केला होता. नाटकास अनेक वकील तसेच न्यायाधीश आपल्या कुटुंबियांसह उपस्थित होते. मात्र नाटकाचा प्रयोग सुरू झाल्यानंतर काही वेळाने प्रेक्षकांतून अश्लील शेरेबाजी होऊ लागली. कलाकारांनी त्याकडे थोडा काळ दुर्लक्षही केले, मात्र त्यानंतर ती शेरेबाजी एवढी वाढत गेली की कलाकारांना काम करणे कठीण झाले. मधुराच्या सांगण्यानुसार एकदा ती शेरेबाजी इतकी वाढली की कलाकारांना एकमेकांचे संवाद ऐकू येईनासे झाले. हा प्रकार असह्य झाल्यावर नाटकाचा प्रयोग थांबवण्यात आला.
नाटकातील कलाकारांनी व आयोजकांनी शेरेबाजी करणा-यांना योग्य शब्दांत समज दिली खरी पण नाटक परत सुरू केल्यावरही थोड्याफार प्रमाणात शेरेबाजी सुरूच होती. अभिनेता चिन्मय मांडलेकर व मधुरा वेलणकर यांनी सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून झाल्या प्रकाराला वाचा फोडली आणि हा प्रकार उघडकीस आला. घडलेल्या प्रकारामुळे आपल्याला अतिशय मनस्ताप झाला आणि संतापही आला, आपल्या देशात 'शिक्षण' आणि 'सुसंस्कृत'पणाचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो, हे या घटनेवरून जाणवले अशी प्रतिक्रिया चिन्मयने व्यक्त केली. तर प्रेक्षकांतील पाच-दहा जणांच्या शेरेबाजीमुळे आमच्याप्रमाणचे अनेक प्रेक्षकानांही त्रास झाला, पण त्यांनी त्याबाबत स्वत:हून बिलकूल आवाज उठवला नाही, याचे वैषम्य वाटले. घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे,  असे मधुरा वेलणकरने सांगितले.
दरम्यान, लोकमतशी बोलताना काही वकिलांनी संताप व्यक्त केला असून अशी हीन वर्तणूक करणा-या समव्यावसायिकांचा निषेध केला आहे. पुण्याच्या बार काउन्सिलशी संपर्क साधून या सर्व प्रकाराची शहानिशा करण्यात येत असल्याचे एका वकिलाने सांगितले आहे.

Web Title: Obscenity in the cultured Pune experiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.