प्रसूतीनंतरच्या ‘नैराश्या’ची मातृत्वाला बाधा
By admin | Published: April 18, 2017 03:04 AM2017-04-18T03:04:09+5:302017-04-18T03:04:09+5:30
सगळं छान चाललेले असूनही ती असं का वागत आहे, याचे कोडे कुणालाच उलगडत नाही. ‘हे बाळ मी सांभाळू शकणार नाही; त्याला कुठेतरी सोडून येते म्हणजे एकदाची सुटेन’
नम्रता फडणीस, पुणे
सगळं छान चाललेले असूनही ती असं का वागत आहे, याचे कोडे कुणालाच उलगडत नाही. ‘हे बाळ मी सांभाळू शकणार नाही; त्याला कुठेतरी सोडून येते म्हणजे एकदाची सुटेन’ अशा विचारांनी आनंददायी मातृत्व वेदनेमध्ये परावर्तित होते. कधीकधी ही मानसिक अवस्था इतक्या पराकोटीपर्यंत जाते की आत्महत्येचा मार्ग पत्करला जातो. हडपसरमध्ये एका महिलेने याच कारणास्तव आत्महत्या केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. प्रसूतीनंतरचे हेच नैराश्य मातृत्वामध्ये बाधा ठरत आहे. या मानसिकतेमुळे कितीतरी महिला मातृत्वाचा आनंद लुटू शकत नाहीत. प्रसूतीनंतर अशाप्रकारे नैराश्याच्या गर्तेत जाणाऱ्या महिलांचे प्रमाण हे २५ टक्के असल्याचे समोर आले आहे.
मातृत्व हे खरेतर निसर्गदत्त वरदान. बाळाच्या आगमनाने आईच्या आयुष्याला एक परिपूर्णता लाभते, मानसिक आणि शारीरिक बदल स्वीकारताना एका जीवाला आकार देण्याची जबाबदारी तिच्यावर असते; पण जेव्हा या वरदानाचे ओझे वाटायला लागते, तेव्हा मातृत्वाबद्दल नकारात्मक भावना मनात घर करू लागतात. त्याला इजा पोहोचविण्यापासून ते स्वत:ला संपविण्यापर्यंतची पावले महिलांकडून उचलली जातात, ही मानसिक अवस्था म्हणजे एक जैविक आजार आहे. ज्याला ‘पोस्ट पार्टल डिप्रेशन’ असे म्हटले जाते परंतु हा एक मानसिक आजार आहे, जो वेळीच उपचार घेतल्यानंतर नक्कीच बरा होऊ शकतो आणि मातृत्व नक्कीच सुखकर होऊ शकते, मात्र या आजाराविषयी अजूनही महिलांमध्ये अज्ञान असल्याने मातृत्वासारख्या आनंददायी क्षणापासून त्या वंचित राहात आहेत.
प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ
डॉ. निकेत कासार यांनी ‘लोकमत’शी बोलताना प्रसूतीनंतर उद्भवणाऱ्या या मानसिक आजाराबद्दल माहिती दिली. प्रसूतीनंतर साधारपणे तीन प्रकारचे मानसिक आजार उद्भवतात, त्यामध्ये ‘पोस्ट पार्टल ब्लूज’, ‘पोस्ट पार्टल डिप्रेशन’ आणि ‘पोस्ट पार्टल सायकोसिस’ यांचा समावेश आहे. पोस्ट पार्टल ब्लूजमध्ये बेचैनी, चिडचिड, बाळाला अॅडजस्ट करून घेताना येणाऱ्या अडचणी असा सामना करावा लागतो. मात्र आठवडाभरामध्ये हा त्रास कमी होऊ शकतो. पोस्ट पार्टल डिप्रेशनमध्ये ‘बाळ माझे नाही, मी त्याचा सांभाळ करू शकत नाही, त्याला कुठेतरी सोडूनच येते’ अशा प्रकारच्या नकारात्मक विचित्र भावनांनी ग्रासले जाते. सायकोसिस ही त्याच्या पुढची स्टेप आहे. सायकोसिस आणि डिप्रेशन हे मानसिक आजार समुपदेशन आणि औषधांनी बरे होऊ शकतात. मात्र त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागतो. (प्रतिनिधी)
कुटुंबात नवीन पाहुणा आलाय, सगळे मस्त आनंदात आहेत पण आनंद होण्याऐवजी माझी चिडचिडच जास्त होत आहे. काय होतंय समजत नाहीए. बाळ रडतंय पण त्याला दूध पाजण्याची, हातात घेण्याची इच्छाच होत नाही, एकसारखी भीती वाटत राहाते, मात्र नवरा आणि सासू सांगतात, की अगं होतं असं, तू घे त्याला, बोलत जा त्याच्याशी, सगळं कसं छान होईल... ती आपल्या मैत्रिणीला व्यथा सांगत होती.
अर्ध्या अर्ध्या तासाने तिला दूध पाजावं लागतंय, मला काही लाईफच उरलेलं नाही, रात्री पण म्हणावी तशी झोप मिळत नाही, उगाच चान्स घेतला मी, तुमचं बरं आहे, तुम्ही बाहेर फिरा, मी सांभाळते तिला, असं वाटतं निघून जावं एकदाचं... अशा नकारात्मक भावनेने तिला ग्रासले होते आणि तिची एकसारखी चिडचिड पाहून कुटुंबातले सगळे वैतागले होते.
शरीरातील हार्मोंन्सच्या बदलांमुळे हा आजार उद्भवू शकतो. आईची मानसिकता लक्षात घेऊन तिला वेळीच मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्याची आवश्यकता असते, मात्र ग्रामीण भागामध्ये तिला उपचारासाठी साधूमंडळी अथवा देवाच्या दारी नेले जाते आणि मग परिस्थिती खालावल्यानंतर डॉक्टरांचे दरवाजे ठोठावले जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रसूतीनंतरच्या मानसिक आजारांची लक्षणे
सतत उदास राहाणे
भूक कमी लागणे किंवा अति भूक लागणे
नकारात्मक भावना
आत्महत्येचे विचार मनात येणे
मूड सातत्याने बदलणे
विचित्र वागणूक
मनात सातत्याने शंका येणे
हा आजार टाळण्यासाठी काय कराल...?
सुदृढ जीवनशैली विकसित करणे
गरोदरपणात मानसिक ताणतणावापासून दूर राहाणे
मानसिक, शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे
जमल्यास डायरी लिहिणे