विघ्न टळले : संप मागे, एसटीने जाता येणार गावी; कर्मचाऱ्यांना ६,५०० रुपयांची सरसकट पगारवाढ  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 07:05 AM2024-09-05T07:05:30+5:302024-09-05T07:05:30+5:30

ST Bus Employee Strike: ऐन गणपतीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बुधवारी रात्री मागे घेतला. कर्मचारी कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी १ एप्रिल २०२० पासून सरसकट ६५०० रुपये वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला.

Obstacles averted: strike behind, village accessible by ST; 6,500 gross salary hike to employees   | विघ्न टळले : संप मागे, एसटीने जाता येणार गावी; कर्मचाऱ्यांना ६,५०० रुपयांची सरसकट पगारवाढ  

विघ्न टळले : संप मागे, एसटीने जाता येणार गावी; कर्मचाऱ्यांना ६,५०० रुपयांची सरसकट पगारवाढ  

मुंबई -  ऐन गणपतीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बुधवारी रात्री मागे घेतला. कर्मचारी कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी १ एप्रिल २०२० पासून सरसकट ६५०० रुपये वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन दिवस चाललेला संप मागे घेतल्याची घोषणा केली.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी धरणे आंदोलन केले. त्या आंदोलनाचे अचानक संपात रूपांतर झाले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मागील दोन दिवस राज्यभरातील एसटी सेवा ठप्प झाली होती. एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या या वेतनवाढीमुळे एसटी कर्मचारी कृती समितीने मुख्यमंत्री आणि सरकारचे आभार मानले आहेत. 

एसटी कर्मचाऱ्यांना अपेक्षित होता तो न्याय, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झालेला आहे. फक्त वेतनापुरती ही बैठक नव्हती. आगारातील सुविधा चांगल्या पद्धतीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.  - उदय सामंत, उद्योगमंत्री 

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बुधवारी राज्यभरातील जवळपास ९६ आगार बंद होते. संपामुळे एसटीच्या ४०,०६९ पैकी २७,४७० फेऱ्या रद्द झाल्या. एसटीचा बुधवारी २२ कोटी रुपयांचा महसूल बुडाला. तर मंगळवारी १६ ते १५ कोटींचे नुकसान एसटीला सोसावे लागले.

७९२ गाड्या उपलब्ध
कोकणात जाणाऱ्या एकूण १००० गाड्यांपैकी ७९२ गाड्या बुधवारी उपलब्ध झाल्या 

कोकणात  जाणाऱ्या गाड्या
मुंबई - ३३७ पैकी ३०६
ठाणे - ४८२ पैकी ३३६
पालघर - १८७ पैकी १५०

निलंबनाची कारवाई मागे
राज्यातील २ हजार एसटी कर्मचाऱ्यांवर विविध कारणांमुळे झालेली निलंबनाची कारवाई मागे घेण्याचे तसेच एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहांची कामे करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. 

Web Title: Obstacles averted: strike behind, village accessible by ST; 6,500 gross salary hike to employees  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.