शासकीय कामात अडथळा; महिलेस कारावास
By admin | Published: May 12, 2017 06:40 PM2017-05-12T18:40:34+5:302017-05-12T18:40:34+5:30
महिला पोलिस अधिकाऱ्यास धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी महिलेस १ वर्ष सश्रम कारावसाची शिक्षा अति. मुख्य न्यायदंडाधिकारी पी. डी. सुभेदार यांनी १२ मे रोजी सुनावली.
ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 12 : महिला पोलिस अधिकाऱ्यास धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी महिलेस १ वर्ष सश्रम कारावसाची शिक्षा अति. मुख्य न्यायदंडाधिकारी पी. डी. सुभेदार यांनी १२ मे रोजी सुनावली.
महिला दक्षता समिती हिंगोली येथे तत्कालीन पोउपनि कोमल तुकाराम शिंदे कार्यरत होत्या. अर्जदार धम्मशीला जीवन घोंगडे व त्यांचे पती जीवन माणिक घोंगडे यांचा वाद मिटवित असताना ११ एप्रिल २०१४ रोजी म.द.स. यांच्या बैठकीत अर्जदाराची आई नामे गंगुबाई विजय भालेराव (५०, रा. सवना) यांनी पोउपनि शिंदे यांना शिवीगाळ करून धक्कबुक्की केली. याबाबत कोमल शिंदे यांनी महिलेविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात फिर्याद दिली. फिर्याद प्राप्त होताच महिलेविरूद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करून फिर्यादीस धक्काबुक्की केल्याप्रकरणी कलम ३५३, ३३२ भादंविअन्वये गुन्हा दाखल झाला. तत्कालीन तपासीक अंमलदार सपोउपनि जगन पवार यांनी गुन्ह्याचा तपास करून हिंगोली न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदरचा खटला अति मुख्य न्यायदंडाधिकारी हिंगोली यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर अति. मुख्य न्यायदंडाधिकारी पी.डी. सुभेदार यांनी १२ मे रोजी गंगुबाई यांना कलम ३५३ भादंवि अन्वये दोषी ग्राह्य धरुन एक वर्ष सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. अनिल इंगळे यांनी काम पाहिले.