' कबीर सिंग' च्या निमित्ताने : कोण घालतंय समाजातील हिंसाचाराला खतपाणी..?  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 07:00 AM2019-07-14T07:00:00+5:302019-07-14T07:00:21+5:30

काय आहे कबीर सिंग मध्ये़? तर वैद्यकीय शिक्षण घेत असलेला नायक प्रेमात अपयशी ठरल्यानंतर प्रचंड व्यसनांध आणि वासनांधही होऊन हिंसाचारी कृत्य करतो...

On the occasion of 'Kabir Singh': Who is responsible for the violence in society ..! | ' कबीर सिंग' च्या निमित्ताने : कोण घालतंय समाजातील हिंसाचाराला खतपाणी..?  

' कबीर सिंग' च्या निमित्ताने : कोण घालतंय समाजातील हिंसाचाराला खतपाणी..?  

Next

कबीर सिंग हा चित्रपट २०० कोटी रूपये उत्पनाच्या क्लबमध्ये गेला. ही फक्त एक बातमी नाही तर सामाजिक स्थितीविषयी चिंता निर्माण करणारी गोष्ट आहे. काय आहे कबीर सिंग मध्ये़? तर वैद्यकीय शिक्षण घेत असलेला नायक प्रेमात अपयशी ठरल्यानंतर प्रचंड व्यसनांध आणि वासनांधही होऊन हिंसाचारी कृत्य करतो. प्रेयसी, तिची बहिण, मित्र यांना मारहाण करतो. याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळतो. सामाजिक स्वास्थ्याविषयी चिंता निर्माण करणाऱ्या अशा वृत्तीेसंदर्भात डॉ, भूषण म्हेत्रे (मानसशास्त्रज्ञ) यांच्याबरोबर राजू इनामदार यांनी साधलेला संवाद.

- हिंसा करावी असे किंवा हिंसा होत असताना त्याचा आनंद वाटण्यामागे काय कारण असते?
- एखाद्या व्यक्तीने हिंसा केली तर त्यासाठी त्या व्यक्तीचा अभ्यास करावा लागेल. केस स्टडी करून मग ती कारणे स्पष्ट करता येतात. समुहाने हिंसा झाली असेल तर त्याची कारणे पुन्हा वेगळी असतात. हिंसा हा प्रत्येकाच्याच स्वभावाचा एक भाग आहे. तो दृश्य स्वरूपात प्रकट होते त्यामागे तो संबधितांना आत थांबवून ठेवता येत नाही हे कारण आहे. तसा तो थांबवावा असे त्यांना वाटत नाही.
 

- तेच तर!  असे का होत असावे?
- पुर्वीच्या पिढीच्या तुलनेत आताच्या पिढीसमोरचे प्रश्न बिकट झाले आहेत. त्यात आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक अशा अनेक गोष्टी आहेत. त्याचा सामना या पिढीतील बहुसंख्यजण करू शकत नाही. त्याशिवाय स्वभावदोष, नैराश्यवृत्तीने मनाचा ताबा घेणे हेही आहे. एका विशिष्ट मयार्देचा पुढे तणाव गेला की मनावरचा ताबा जातो. त्यावेळी हिंसाचारी कृत्ये घडतात, मात्र याला दुसरीही एक बाजू आहे. असा ताबा गेला की हिंसाच केली जाते असे नाही,

तर क्वचीत कोणी घाबरते, कुठेतरी दडी मारून बसते, कोणासमोर यायचे टाळते, स्वत:ला कोंडून घेते असेही होते. समाजाला त्रास होईल असे वागणाºयांची संख्या जास्त आहे ही वस्तुस्थिती आहे. दबलेली हिंसा कधीतरी कोणीतरी असे करते आहे हे पाहून त्याला प्रतिसाद देते चित्रपटांमधील अशा प्रसंगाना मिळणारा प्रतिसाद यातूनच येतो. तसे करणाऱ्यांमध्ये प्रतिसाद देणारे स्वत:ला पहात असतात.
 

-पण असे का होत असावे?
-याचे कारण अगदी लहानपणापासूनच स्वभावात संयमाचा अभाव असणे हेच आहे. हा अभाव अनुभवातूनच येतो. समजा पिज्झा खायचा आहे तर तो मोबाईलवरून अगदी सहज मागवता येतो. कसलाही त्रास न होता तो त्वरीत मिळतो. असे लगेच काही मिळणे मग स्वभाव होतो. त्यानंतर घरात काही करायला सांगितले तर त्यासाठी स्वाभाविकच वेळ लागतो. हा वेळ कळ काढणे, म्हणजे संयम धरणे मग सहनच होत नाही. फक्त तेवढेच नाही तर अनेक गोष्टी अशा पटकन मिळत असल्याने संयम पाळायचा नाही हे मग स्वभावातच रूतून बसते. कोणत्याही गोष्टीला वेळ लागला, कशाला नकार मिळाला की भावना तीव्र होतात, प्रक्षोभ निर्माण होतो. चिडचिड वाढते, राग येऊ लागतो. ते प्रमाणाबाहेर गेले की त्यातून काही कृत्य घडतात.
 

- वृत्ती अशी घडण्यामागे सोशल मीडिया किती कारणीभूत आहे?
- तो कारणीभूत आहे म्हणूनच तर सरकारने पोर्नोग्राफीवर बंदी घातली. अगदी सहजपणे, एका क्लिकवर सगळे काही मिळते आहे याचा अगदी निश्चितपणे मनावरपरिणाम होतो. शालेय वयापासूनच ही सवय लागली की मोठेपणी ती जात नाही. सगळ्याच भावना प्रत्येकाच्या स्वभावात असतात, मात्र कधी कोणत्या भावना कशा प्रकट करायच्या याचे काही समाजमान्य नियम, संकेत आहेत. लगेच रागाला येणाऱ्यांमध्ये हे भान राहत नाही.
 

म्हणून थेट हिंसेला प्रवृत्त होतात?
हिंसेला प्रवृत्त होण्यामागे कारणे वेगळी असतात. सुरूवातीला सांगितले तसे एखाद्या प्रकरणात तो अभ्यासाचा व नंतर निष्कर्ष काढण्याचा प्रकार आहे, कौटूंबिक, आर्थिक किंवा अतिलाड, संयमाचा अभाव, नकार पचवण्याची सवय नसणे अशा बऱ्याच कारणांनी कोणी थेट हिंसा करण्याच्या टोकाला जाऊ शकतो. त्याला प्रतिसाद देणाऱ्यांमध्येही ते कुठेतरी असते, पण त्यांच्यात संयम, किंवा समाजाचे भान असल्यामुळे ते बाहेर प्रकट होत नाही व तेवढ्यापुरता प्रतिसाद दिल्यानंतर त्याचे दमनही आपोआप होते.
 

-एक मानसशास्त्रज्ञ म्हणून आताच्या पिढीचे तुमचे निरीक्षण काय?
-हल्लीच्या जगण्यात ताणतणांवांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्याचे नियंत्रण किंवा व्यवस्थापन करायला शिकवले गेले पाहिजे. संयम, वाट पाहणे, प्रतिक्षा करणे, नाही मिळाले तरीही त्याला शांतपणे सामोरे जाणे हे सगळेच शिकवले पाहिजे. त्यासाठी लहानपणापासून पालकांनीही त्यांच्यासमोर तसे वागले पाहिजे. अनेक गोष्टी या पालक कसे वागतात, किंवा लहानपणी काय वातावरण आसपास होते त्यातून येत असतात. त्याची काळजी घेतली पाहिजे. मुलांमध्ये खिलाडूवृत्तीची जोपासना केली तर पुढे त्याची सवय त्यांना लागते. 

.........  
चौकटी
दिवार चित्रपटात अमिताभ आईला म्हणतो माझ्या हातावर मेरा बाप चोर है असे गोंदणाºयांना सर्वप्रथम शिक्षा व्हायला हवी. तर त्याची आई म्हणते ते तुझे कोणी नव्हते, पण मी तर तुझी आई होते. तुने क्यो मेरे माथे पे इसका बेटा चौर है लिखा? अशा संवादातून मुल्य जपण्याची पुर्वीच्या लेखकांची वृत्ती सध्याच्या चित्रपटात दिसत नाही. कबीर सिंग च्या निमित्ताने 

देवदास चित्रपटात नायक प्रेमातील अपयश दारूत बुडवतो असे दाखवले, मात्र तो हिंसाचारी दाखवला नाही. तरीही त्या चित्रपटातून चुकीचा संदेश जातो म्हणून व्ही. शांताराम यांनी माणूस मधून प्रेमात अपयश आले तरी कर्तव्यबुद्धीने नोकरीवर जाणारा नायक दाखवला. आता कबीर सिंग ला असे उत्तर देणारा चित्रपट तयार होईल असे वाटत नाही. 

Web Title: On the occasion of 'Kabir Singh': Who is responsible for the violence in society ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.