मोक्षदा एकादशीचे निमित्त : पंढरीत भाविक पांडुरंगाचरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 05:09 AM2017-12-01T05:09:05+5:302017-12-01T05:09:22+5:30
मार्गशीर्षातील मोक्षदा एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर करीत कडाक्याच्या थंडीतही चंद्रभागेत पवित्र स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेतले़
पंढरपूर (जि. सोलापूर) : मार्गशीर्षातील मोक्षदा एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर करीत कडाक्याच्या थंडीतही चंद्रभागेत पवित्र स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेतले़
मार्गशीर्षातील दुसरा गुरुवार आणि मोक्षदा एकादशी असा योग साधत काही भाविक पंढरीत मुक्कामीच दाखल झाले होते तर काही भाविक पहाटेपासूनच पंढरीत आले होते. त्यामुळे स्टेशन रस्ता, शिवाजी चौक, भक्तीमार्ग, चंद्रभागा वाळवंटात भाविकांची गर्दी झाली होती़
कडाक्याच्या थंडीतील पवित्र स्नान झाल्यानंतर भाविक दर्शनरांगेकडे मार्गस्थ झाले. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप भरला. सकाळी १० वाजेपर्यंत ही रांग वाढतच गेली. समाधानकारक पावसामुळे दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. पांडुरंगाच्या कृपेने यंदा आम्ही समाधानी आहोत, असे अनेक भाविकांनी सांगितले. पंढरीत मोक्षदा एकादशीनिमित्त गर्दी वाढल्याने ज्या भाविकांना रांगेत उभे राहून पदस्पर्श दर्शन घेणे शक्य झाले नाही त्यांनी मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेतले़
मिठाईच्या दुकानांत गर्दी़़!
सावळ्या विठूरायाचे दर्शन घेऊन धन्य झाल्यानंतर परत गावाकडे जाणाºया वारकºयांनी मिठाईच्या दुकानांत गर्दी केली़ अनेक भाविकांनी प्रसाद म्हणून पेढे, चिरमुरे, बत्ताशे, हळदी, कुंकू, बुक्का खरेदी केला; तसेच घरातील बाळगोपाळांसाठी खेळणी घेतली़ महिला भाविकांनी समई, पणत्या, पंचपाळा यांसह संसारिक साहित्याची खरेदी केल्याचे दिसून आले.