एक स्मरण जनस्थानच्या निमित्ताने!
By admin | Published: January 20, 2017 04:23 PM2017-01-20T16:23:05+5:302017-01-20T19:02:19+5:30
विष्णु सखाराम खांडेकर यांना ‘ययाती’साठी १९७४ साली प्राप्त झाला आणि चौदा वर्षे मराठीच्या नशिबी वनवास आला. योगायोगाने तो संपुष्टात आणला दुसऱ्या विष्णुने
- हेमंत कुलकर्णी
साहित्याच्या प्रांतातील ‘ज्ञानपीठ’ हा सर्वोच्च सन्मान. विष्णु सखाराम खांडेकर यांना ‘ययाती’साठी १९७४ साली प्राप्त झाला आणि चौदा वर्षे मराठीच्या नशिबी वनवास आला. योगायोगाने तो संपुष्टात आणला दुसऱ्या विष्णुने. विष्णु वामन शिरवाडकर यांनी. तत्पूर्वी १९८२ नंतर विशिष्ट साहित्य कृतीसाठी तो जाहीर करण्याची परंपरा खंडित झाली. विशिष्ट भाषेच्या साहित्य सेवेसाठी तो बहाल करण्याची नवी परंपरा रुजू झाली. याच परंपरेचे पालन करुन वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना १९८७चा पुरस्कार १९८८ मध्ये जाहीर झाला. यातील दुसरा पण विचित्र योगायोग म्हणजे ८७च्या पुरस्कारासाठी निवड समितीच्या पुढ्यात असलेली दोन्ही नावे मराठीतल्याच साहित्यिकांची. शिरवाडकर आणि पु.ल.देशपांडे. निवड समितीच्या अध्यक्षपदी तत्कालीन केन्द्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आणि बहुभाषा कोविद पी.व्ही. नरसिंह राव.
राजकारणातच गटतट असतात असे निर्भर्त्सनापूर्ण उसासे टाकीत राहणाऱ्या साहित्यिकांमध्येही ते असतातच. किंबहुना अधिक तीव्रतेने असतात. भूपृष्ठावर फारसे येत नाहीत, इतकेच. स्वाभाविकच काही पु.ल. देशपांडे यांचे समर्थक तर काही कुसुमाग्रज समर्थक. कोण आपला, कोण त्यांचा हे दोहोंना चांगलेच ज्ञात. दोन्ही गटांचे दडपण तुल्यबळ. निवड समितीदेखील गांगरलेली. अखेर एक गद्यलेखक तर दुसरा कवी आणि कवितेमध्ये जे वैश्विक आवाहन असते, ती जशी साऱ्या सीमा उल्लंघणारी असते, तसे गद्य नसते म्हणून निवड समितीचे तुळशीपत्र कुसुमाग्रजांच्या पारड्यात. ज्ञानपीठाच्या परंपरेला साजेशा कार्यक्रमात मुंबईत कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ बहाल करण्यात आले. मोठा नयनरम्य आणि श्रवणसुंदर सोहळा पार पडला.
दरम्यानच्या काळात कुसुमाग्रजांची एक कविता अवतरली.
म्हणून
विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती
म्हणून नव्हती भीती तिला पराजयाची
जन्मासाठी हटून केव्हां नव्हती बसली
म्हणून नाही खंतहि तिला मरावयाची.
कुसुमाग्रज हे नाशिकचे ग्रामदैवत. त्यांना ज्ञानपीठ प्राप्त झाल्याचा अवर्णनीय आनंद नाशिककरांना झाला. त्यातून कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अवतार उदयास आला. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आडसाली जनस्थान हा साहित्य पुरस्कार देण्याची कल्पना दस्तुरखुद्द कुसुमाग्रजांनी जन्मास घातली. आणि यंदाचा जनस्थान विजया राजाध्यक्ष यांना जाहीर झाला. त्यानिमित्ते हे स्मरण