तानाजीच्या निमित्ताने आठवण ‘नाऊजी’ या दुसऱ्या ‘सिंहा’ची

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 06:00 AM2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:16+5:30

मुठभर मावळ्यांच्या संगतीने किल्ले सिंहगड सर करणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर आधारीत चित्रपट सध्या चांगली गर्दी खेचत आहे. ‘गड घेऊनी सिंह आला’

On the occasion of Tanaji, the remembrance of another 'lion' of 'Naoji' | तानाजीच्या निमित्ताने आठवण ‘नाऊजी’ या दुसऱ्या ‘सिंहा’ची

तानाजीच्या निमित्ताने आठवण ‘नाऊजी’ या दुसऱ्या ‘सिंहा’ची

googlenewsNext
ठळक मुद्दे‘गड घेऊनी सिंह आला’

- सुकृत करंदीकर - 
पुणे : मोगलांवर मात करत किल्ले कोंढाणा (सिंहगड) तानाजी मालुसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आणला. मात्र त्यावेळच्या घनघोर लढाईत तानाजी धारातिर्थी पडले.  तानाजींच्या पश्चात नाऊजी बलकवडे या पराक्रमी वीराने पुन्हा तसाच पराक्रम गाजवत सिंहगड पुन्हा एकदा मोगलांच्या कब्ज्यातून छत्रपती राजाराम महाराजांच्या स्वराज्यात आणला. तानाजींना वीरमरण आल्याने त्यांच्या पराक्रमाचे वर्णन ‘गड आला पण सिंह गेला’ असे करण्यात आले. गड जिंकून सहीसलामत परतणाऱ्या नावजींचा पराक्रम ‘गड घेऊनी सिंह आला,’ या शब्दात नोंदला गेला आहे.  
मुठभर मावळ्यांच्या संगतीने किल्ले सिंहगड सर करणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर आधारीत चित्रपट सध्या चांगली गर्दी खेचत आहे. तानाजी मालुसरे यांच्या मावळ्यांच्याप्रमाणेच तुटपुंज्या साधनसामग्री आणि मोजक्या बळावर नाऊजी यांनी सिंहगड जिंकण्याचा पराक्रम केला होता.  
नाऊजी यांचे वंशज इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी हा रम्य इतिहास उलगडला. त्यांनी सांगतले, की १६७० मध्ये तानाजींनी सिंहगड जिंकला. मात्र छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी यांच्यानंतर औरंगजेबाने स्वराज्यातील एकेक किल्ले घेण्याचा सपाटा लावला. १६८९ पर्यंत रायगड, राजगड, पुरंदर, सिंहगड असे अनेक महत्वाचे किल्ले मोगलांच्या ताब्यात गेले. राजाराम महाराज दूर तामिळनाडूमध्ये जिंजीला होते. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या आदेशाने कोल्हापुर ते साताºयापर्यंतच्या स्वराज्याचा कारभार रामचंद्रपंत अमात्य आणि सातारा ते पुणेपर्यंतचा कारभार शंकराजी नारायण पंतसचिव पाहात होते. संताजी घोरपडे, धनाजी जाधव हे सरदार त्यांना साथ देत होते. महत्वाचे किल्ले मोगलांकडे असल्याने राजमाचीवरुन स्वराज्याचा कारभार चालवला जात होता.


‘‘त्याच धामधुमीत मन्सुरखान बेग जुन्नरकर या मोगलांच्या सरदाराने १६९२ मध्ये लोहगडही जिंकला. एकविरादेवीच्या मंदीरावर त्याने हल्ला केला. नाऊजी यांनी मावळातील विठोजी कारके यांना जोडीला घेत मन्सुरखानकडून लोहगड पुन्हा स्वराज्यात आणला. तो पराक्रम पाहून शंकराजी पंतसचिवांनी नावजी बलकवडे यांना साद घातली. ‘सिंहगड जिंकावा लागेल,’ असे त्यांना सांगितले. १६९३ च्या २५ जुनला नाऊजी यांनी सिंहगड परत घेण्याची जबाबदारी स्विकारली,’’ असे बलकवडे यांनी सांगितले.
त्यानुसार नाऊजी यांनी कारके यांना सोबत घेत आषाढ शुद्ध अष्टमीची रात्र सिंहगडावरच्या हल्ल्यासाठी निवडली. वर्ष होते १६९३ आणि रात्र होती १ जुलैची. तानाजी यांच्याप्रमाणेच नाऊजी यांनीही सिंहगडाच्या पश्चिमेच्या कड्याला दोर लावले. पावसाळी रात्रीच्या अंधारात अवघ्या तीनशे-साडेतीनशे मावळ्यांना घेऊन सिंहगडावर प्रवेश केला. त्यावेळी मोगलांचे दीड हजार सैनिक गडावर होते. परंतु, नाऊजींच्या नेतृत्त्वात मुठभर मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली आणि मोगलांवर मात केली. सिंहगडावर पुन्हा भगवा फडकला. 
 

राजाराम महाराजांचे कौतूक
सिंहगड स्वराज्यात आणल्याबद्दल छत्रपती राजाराम महाराज यांनी नाऊजी यांना पत्र लिहून त्यांचे कौतूक केले. राजाराम महाराज पत्रात म्हणतात, ‘‘तुम्ही कीले सिंहगडचे कार्यसिद्धी समई धारेस चढोन तरवारेची शर्त केली. पुढेही कार्यप्रयोजनास तत्पर आहा हे वर्तमान राजश्री शंकराजी पंडित सचीव यांनी स्वामीस लिहीले.’’ यानंतर नाऊजी यांना सावरगाव इनाम देण्यात आले. सिंहगड जिंकून सहीसलामत परत येण्याच्या त्याच्या पराक्रमाचे वर्णन पुढे ज्येष्ठ साहित्यिक रणजित देसाई यांनी ‘गड घेऊनी सिंह आला’, या कथेत केले आहे. सिंहगडाची मोहिम फत्ते करणाºया नाऊजी बलकवडे यांनी बारा मावळातील कोरीगड, लोहगड, सुधागड हे किल्लेही स्वराज्यात आणले.
 

राजाराम महाराज आणि सिंहगड
‘‘तामिळनाडूतल्या आठ वर्षांच्या वास्तव्यानंतर राजाराम महाराज महाराष्ट्रात आले. मात्र जिंजीपासूनच्या प्रवासाची त्यांना दगदग झाली. मोगलांच्या जालनापुरा (जालना) या मराठवाड्यातील ठाण्यावर त्यांना हल्ला करायचा होता. तत्पुर्वी त्यांनी विश्रांतीसाठी सिंहगडावर मुक्काम हलवला. याच दरम्यान वयाच्या २९ व्या वर्षी ३ मार्च १७०० रोजी त्यांचे सिंहगडावर निधन झाले. औरंगजेबाला फितुर झालेल्या वतनदारांच्या ३५ हल्लेखोरांनी नाऊजी यांनाही पिंप्री घाटात (ताम्हिणी परिसरात) एकटे गाठून त्यांची हत्या केली. सिंहगड जिंकणारा वीर स्वकीयांच्या दगलबाजीचा बळी ठरला. 

------(समाप्त)-----
 

      

Web Title: On the occasion of Tanaji, the remembrance of another 'lion' of 'Naoji'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.