प्रसंगी बँकिंग क्षेत्रातही हस्तक्षेप करावा लागेल

By admin | Published: January 4, 2015 02:40 AM2015-01-04T02:40:03+5:302015-01-04T02:40:03+5:30

भारत हा एक लोकशाही देश असल्याने सामान्य माणसाचा आवाज बँकिंग क्षेत्रापर्यंत पोहोचविण्यासाठी वेळप्रसंगी राजकीय हस्तक्षेपही करावा लागेल,

Occasionally there will be interference in the banking sector | प्रसंगी बँकिंग क्षेत्रातही हस्तक्षेप करावा लागेल

प्रसंगी बँकिंग क्षेत्रातही हस्तक्षेप करावा लागेल

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूतोवाच : बँका व्यावसायिक पद्धतीनेच चालविणे गरजेचे, पण उत्तरदायित्वाची भावनाही हवीच
पुणे : बॅँकिंग क्षेत्रात कोणत्याही राजकीय लुडबुडीला आपला विरोधआहे. मात्र, भारत हा एक लोकशाही देश असल्याने सामान्य माणसाचा आवाज बँकिंग क्षेत्रापर्यंत पोहोचविण्यासाठी वेळप्रसंगी राजकीय हस्तक्षेपही करावा लागेल, असे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बँका या व्यावसायिक पद्धतीनेच चालविल्या जाणे गरजेचे असले, तरी त्यांनी उत्तरदायित्वाची भावनाही जोपासायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले.
नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ बँक मॅनेजमेंट येथे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या ‘ज्ञानसंगम’ परिषदेत मार्गदर्शन करताना मोदी बोलत होते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा, रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन आदी या वेळी उपस्थित होते. पंतप्रधान म्हणाले, बँकिंग क्षेत्राबाबत सरकारचे कोणतेही छुपे हितसंबंध नाहीत, हे लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपली क्षमता वाढवायला हवी. देशातील घडामोडींबाबत बॅँकिंग क्षेत्राने संवेदनशील असायला हवे. देश कोणत्या दिशेने चालला आहे, त्याकडे पाहायला हवे.
सामान्य माणसासाठी बॅँकिंग अधिक सुलभ व्हावे, याकरिता प्रयत्न करायला हवेत. कर्जे देताना रोजगाराभिमुख उद्योगांना प्राधान्य द्यायला हवे. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जेही बँकांच्या प्राधान्यक्रमावर यायला हवीत. कारण ही देशासाठी उत्पादनक्षम गुंतवणूक ठरू शकते. युवकांमधील कौशल्यविकास ही देशाची गरज असून, त्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना बँकांनी करावी.
बँकिंग क्षेत्राला आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले, सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी म्हणून बँकांनी दरवर्षी एक क्षेत्र निवडून त्यामध्ये सकारात्मक काम करण्याचाच प्रयत्न करायला हवा. स्वच्छता अभियानाचे उदाहरण घेतले, तर त्याने युवकांच्या मनात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. बँकांनी पुढाकार घेऊन २० ते २५ हजार स्वच्छता उद्योगांना मदत करायला हवी. देशामध्ये आर्थिक साक्षरता अत्यंत कमी असल्याची खंत व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले, सामान्य माणसामध्ये आर्थिक साक्षरता यावी, यासाठी बँकांनी प्रयत्न करायला हवेत.

देशातील २७ राष्ट्रीय बँकांनी एकत्र यावे
बँकिंग क्षेत्र हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रतिबिंब असते. जपान आणि चीन या देशांच्या आर्थिक प्रगतीच्या काळात त्यांच्या बँकाही जगातील ‘टॉप टेन’ बँकांमध्ये होत्या. भारतीय बँकांनीही आपला दर्जा उंचावून जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवायला हवा. यासाठी देशातील २७ राष्ट्रीय बँकांनी एकत्र येऊन आपली बलस्थाने विकसित करायला हवीत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण लवकरच साजरा करणार आहोत. त्यादृष्टीने बँकिंग क्षेत्राने आपली उद्दिष्टे निश्चित करायला हवीत. २०२२पर्यंत ‘प्रत्येकासाठी घर’ हे आपले स्वप्न आहे. देशात अद्यापही ११ कोटी घरांची आवश्यकता आहे. या क्षेत्रात बॅँकिंग क्षेत्राला मोठे काम करण्याची संधी आहे, असे मोदी यांनी सांगितले.

मुंबईत सुरू झालेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रसायनशास्त्राचे नोबेल सन्मानित कुर्ट वुथरिच यांचा सत्कार केला. - वृत्त/२

Web Title: Occasionally there will be interference in the banking sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.