दीडशे कोटींच्या घोटाळ्यातील समुद्र कुटुंब अखेर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 03:28 AM2018-03-09T03:28:05+5:302018-03-09T03:28:05+5:30
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आकर्षक व्याज देण्याच्या नावाखाली तीन हजार सामान्य लोकांना तब्बल दीडशे कोटी रुपयांनी लुबाडणा-या बदलापूरच्या समुद्र कुटुंबातील आणखी चार सदस्यांना ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली.
ठाणे - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आकर्षक व्याज देण्याच्या नावाखाली तीन हजार सामान्य लोकांना तब्बल दीडशे कोटी रुपयांनी लुबाडणा-या बदलापूरच्या समुद्र कुटुंबातील आणखी चार सदस्यांना ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. अटक टाळण्यासाठी वर्षभरापासून हे आरोपी न्यायालयाच्या पाय-या झिजवत होते.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणा-या सागर इन्व्हेस्टमेंट नावाच्या संस्थेची स्थापना सुहास समुद्र याने बदलापूर येथे केली होती. गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष या संस्थेने दाखवले. या ठेवी शेअर मार्केटमध्ये गुंतवून १५ ते १८ टक्के व्याज देण्याचे आमिष आरोपींनी गुंतवणूकदारांना दाखवले. बँकेपेक्षा जास्त व्याज मिळण्याच्या आशेने अनेकांनी संस्थेमध्ये पैसा गुंतवला. जवळपास तीन ते चारहजार गुंतवणूकदारांकडून १५० ते २०० कोटी रुपये उकळल्यानंतर आरोपींनी हात वर केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय धुरी यांनी फरार आरोपी श्रीराम सुहास समुद्र, अनघा श्रीराम समुद्र, सुप्रीती स्वानंद समुद्र आणि कैवल्य स्वानंद समुद्र यांच्याविरुद्धचे सर्व पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळले. बुधवारी या चारही आरोपींना अटक झाली़